Join us  

शेअर बाजाराचे वारे वाहणार कोणत्या दिशेने?

By प्रसाद गो.जोशी | Published: June 05, 2023 10:16 AM

जीडीपीची अपेक्षेपेक्षा चांगली आलेली आकडेवारी, चलनवाढीचा कमी झालेला वेग, यामुळे गत सप्ताहात बाजार वाढला.

- प्रसाद गो. जोशी 

जीडीपीची अपेक्षेपेक्षा चांगली आलेली आकडेवारी, चलनवाढीचा कमी झालेला वेग, यामुळे गत सप्ताहात बाजार वाढला. या सप्ताहामध्ये व्याजदराबाबत रिझर्व्ह बँकेच्या बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून आहे. याच जोडीला मान्सूनची प्रगती, औद्योगिक उत्पादनाची जाहीर होणारी आकडेवारी, परकीय वित्तसंस्थांची कामगिरी हे घटकही बाजाराला दिशादर्शक ठरतील.

गत सप्ताहामध्ये बाजाराच्या निर्देशांकांमध्ये किंचित वाढ झाली आहे. या सप्ताहात सोमवारी जाहीर होणारी औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी बाजाराला आणखी वर नेण्यास साह्यभूत ठरेल. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक होऊन त्याचे निर्णय जाहीर होणार आहेत. यावेळी व्याजदर कायम राहण्याची अपेक्षा आहे. याप्रमाणे निकाल आल्यास बाजार वाढू शकतो.

परकीय वित्तसंस्था जोमात

मे महिन्यात भारतीय शेअर बाजारामध्ये परकीय वित्तसंस्थांनी ४३,८३८ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, ती नऊ महिन्यांमधील सर्वाधिक गुंतवणूक ठरली आहे. याआधी ऑगस्ट महिन्यामध्ये  या संस्थांनी भारतीय बाजारामध्ये ५१,२०४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. परकीय वित्तसंस्थांनी केलेल्या गुंतवणुकीपैकी ७,४७१ कोटी रुपये हे रोखे बाजारामध्ये गुंतविले गेले आहेत.

पुढे काय? : जूनमध्येही गुंतवणूक सुरूच राहण्याची शक्यता आहे. पहिल्या २ दिवसांमध्येच या संस्थांनी ६,५१९.७ कोटींची गुंतवणूक केली आहे. परकीय वित्तसंस्था सध्या चीनमध्ये विक्री करीत आहेत. भारतीय अर्थव्यवस्था जोरदार वाढत असल्याने परकीय गुंतवणूकदारांना भारतामध्ये गुंतवणूक करण्यात रस दिसू लागला आहे. देशांतर्गत वित्तसंस्थांनी मात्र मे महिन्यामध्ये विक्री केल्याचे समोर आले आहे. या संस्थांनी गत महिनाभरामध्ये वित्त, वाहन, दूरसंचार आणि बांधकाम या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार