Join us  

Adani चं मोठं यश, पहिल्यांदाच सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री घेणार समूहाची 'ही' कंपनी?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 3:47 PM

Gautam Adani Group : गौतम अदानी समूहासाठी एक आनंदाची बातमी आहे. गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाच्या मालकीच्या या कंपनीची ३० शेअर्सच्या निर्देशांकात समावेश होण्याची शक्यता आहे.

अदानी समूहाची कंपनी अदानी एंटरप्रायजेससाठी (Adani Enterprises) आनंदाची बातमी आहे. आयआयएफएल अल्टरनेटिव्ह रिसर्चने एका नोटमध्ये, बीएसई सेन्सेक्स निर्देशांकावर अदानी एंटरप्रायझेसचा (एईएल) प्रवेश शक्य असल्याचं म्हटलं आहे. अदानींचा शेअर आयटी कंपनी विप्रोची जागा घेऊ शकतो.  

गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाच्या मालकीच्या कोणत्याही कंपनीचा बीएसई सेन्सेक्सच्या ३० शेअर्सच्या निर्देशांकात समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अदानी समूहाच्या फ्लॅगशिप कंपनीची २०२३ मध्ये सेन्सेक्समध्ये समावेश होणे अपेक्षित होते, परंतु हिंडेनबर्ग वादामुळे त्याची शक्यता धूसर झाली. त्याची घोषणा आता शुक्रवार, २४ मे रोजी होण्याची शक्यता आहे. 

ब्रोकरेजचं म्हणणं काय? 

आयआयएफएल अल्टरनेटिव्ह रिसर्चच्या म्हणण्यानुसार, अदानी एंटरप्रायझेसचा सेन्सेक्समध्ये समावेश केल्यानं इंडेक्सवर नजर ठेवणाऱ्या निष्क्रिय फंडातून ११८ मिलियन डॉलर्सचा (१००० कोटी रुपये) फ्लो होईल. दुसरीकडे, विप्रोला बाहेर केल्यानंतर ५६ दशलक्ष डॉलर (सुमारे ५०० कोटी रुपये) काढून घेण्याचा अंदाज आहे. 

बीएसई १०० निर्देशांकातही बदल होणार? 

ब्रोकरेज हाऊसनं दिलेल्या माहितीनुसार बीएसई १०० इंडेक्समध्ये ५ शेअर्सदेखील जोडले जाऊ शकतात. आरईसी, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस, अदानी पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स हे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ, पेज इंडस्ट्रीज, झी एंटरटेनमेंट एंटरप्रायजेस, एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस आणि ज्युबिलंट फूडवर्क्स यांची जागा घेऊ शकते. 

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :गौतम अदानीव्यवसाय