Join us  

PPF मध्ये गुंतवणूकीची नोट करा ही विशेष तारीख, एका दिवसासाठीही चुकलात तरी होईल मोठं नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:50 AM

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना आहे. पण का? याचं कारण म्हणजे इथे चांगल्या व्याजासह कर सवलती देखील मिळतात.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम योजना आहे. पण का? याचं कारण म्हणजे इथे चांगल्या व्याजासह कर सवलती देखील मिळतात. या योजनेत (Public Provident Fund) गुंतवणूक केव्हा करावी याबद्दल अनेक वेळा लोकांच्या मनात संभ्रम असतो. एकत्र गुंतवणूक करायची की दर महिन्याला पैसे गुंतवायचे? असे अनेक प्रश्न त्यांच्या मनात असतात. 

पर्सनल फायनान्स तज्ज्ञांचं मत आहे की जर तुम्हाला पीपीएफचा पुरेपूर फायदा घ्यायचा असेल तर त्याची 'विशेष' तारीख लक्षात ठेवली पाहिजे. जर तुम्ही महिन्याच्या पहिल्या ५ दिवसात पीपीएफमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला अधिक फायदे मिळतील. पीपीएफवर ७.१ टक्के व्याज दिलं जात आहे. तसंच प्रत्येक तिमाहीला व्याजाची समीक्षा केली जाते. पीपीएफ खात्यातील व्याज मंथली कम्पाऊंडिंग अंतर्गत मोजलं जातं.

पीपीएफमध्ये काय आहे तारखेचं महत्त्व? 

गुंतवणूकदारानं दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत पीपीएफ खात्यात पैसे जमा करावेत. त्या महिन्याच्या ५ तारखेनंतर जमा केल्यास, जमा केलेल्या रकमेवर व्याज मिळत नाही. दर महिन्याला व्याजाची गणना महिन्याच्या ५ तारखेपर्यंतच्या किमान रकमेवर केली जाते. उदाहरणार्थ, जर तुम्ही २० एप्रिल रोजी पैसे जमा केले तर तुम्हाला फक्त ११ महिन्यांसाठी व्याज दिलं जाईल. दुसरीकडे, जर तुम्ही ५ एप्रिलला गुंतवणूक केली तर तुम्हाला संपूर्ण १२ महिन्यांसाठी व्याजाचा लाभ मिळेल. यामध्ये जवळपास १०,६५० रुपये नफा होऊ शकतो. 

रिटर्नचं गणित चुकणार 

नव्या आर्थिक वर्षापासूनचा आपण विचार करू. तुम्ही एप्रिलपासून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तर एप्रिलचे पहिले ५ दिवस खूप महत्त्वाचे असतील. कारण, जर तुम्ही पीपीएफमध्ये ५ एप्रिलपर्यंत १.५ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला आर्थिक वर्षात ७.१ टक्के दराने एकूण १०,६५० रुपये व्याज मिळेल. पण, इथे एक ट्विस्ट आहे, जर तुम्ही हे पैसे ६ एप्रिल किंवा त्यानंतर जमा केले तर आर्थिक वर्षात मिळणारं व्याज ११ महिन्यांसाठी मोजले जाईल. म्हणजे एका महिन्याचं तुमचं व्याज गेलं. अशा प्रकरणात तुम्हाला ९,७६३ रुपये व्याज मिळेल. म्हणजे तुम्हाला ८८७ रुपये कमी व्याज मिळेल. त्यामुळे तुम्हाला कमी रिटर्न मिळेल. त्यामुळे महिन्याची ५ तारीख खूप महत्त्वाची आहे. 

दर महिन्याला गुंतवणूक करावी का? 

तुम्हाला तुमच्या पीपीएफवर अधिक व्याज मिळवायचं असेल तर दर महिन्याला गुंतवणूक करण्याऐवजी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला सर्व पैसे गुंतवा. पीपीएफमध्ये वर्षभरात गुंतवणूक करण्याची मर्यादा १.५ लाख रुपये आहे. जर तुम्ही गुंतवणूकीचा प्लॅन करत असाल तर महिन्याच्या १ ते ५ तारखेदरम्यान तो करा. याशिवाय तुम्ही दर महिन्याला गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ५ तारखेला किंवा त्यापूर्वी पैसे गुंतवा. 

१० हजारांचे बनतील २.७१ लाख 

समजा तुम्ही पीपीएफ खात्यात दरवर्षी १० हजार रुपये जमा केले, तर सध्याच्या व्याजदरानुसार १५ वर्षांनंतर ते २ लाख ७१ हजार २१४ रुपये होईल. १५ वर्षातील एकूण ठेव रक्कम १.५ लाख रुपये असेल आणि व्याज स्वरूपात उत्पन्न १ लाख २१ हजार २१४ रुपये असेल. एकूण २.७१ लाख रुपये मिळतील जे पूर्णपणे करमुक्त असेल.

टॅग्स :पीपीएफगुंतवणूक