Join us  

NPS मध्ये गुंतवणूक केलीये? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, १ एप्रिलपासून होणार 'हा' बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 10:25 AM

एप्रिल महिन्यापासून नॅशनल पेन्शन स्कीम खात्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे.

एप्रिल महिन्यापासून नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) खात्यात लॉग इन करण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. यासाठी दुहेरी सुरक्षा प्रणाली (Two-Factor Authentication) लागू केली जाणार आहे. यामध्ये एनपीएस सदस्यांना आधार ऑथेंटिकेशन आणि मोबाइलवर मिळालेल्या ओटीपीद्वारे लॉग इन करावं लागेल. ही नवी प्रणाली १ एप्रिलपासून लागू होणार आहे. 

पेन्शन फंड रेग्युलेटर पीएफआरडीएनं (PFRDA) अलीकडेच टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य केलं आहे. यामुळे एनपीएस खात्याची सुरक्षा वाढेल, असं नियामकाचं म्हणणं आहे. हे खातं सेंट्रल रेकॉर्ड कीपिंग एजन्सी (CRA) प्रणालीद्वारे चालवलं जातं. सीआरए सिस्टम एक वेब आधारित प्लॅटफॉर्म आहे, जे एनपीएसशी संबंधित कामांसाठी तयार करण्यात आलंय. 

सध्या कोणती प्रणाली? 

सध्या एनपीएस सदस्यांना खात्यात लॉग इन करण्यासाठी युझर आयडी आणि पासवर्ड आवश्यक आहे. केवळ याद्वारे, खात्यात लॉग इन केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे बदल आणि पैसे काढणे शक्य आहे. सध्या, केंद्र आणि राज्य सरकारचे नोडल अधिकारी सीआरए प्रणालीमध्ये लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आधारित प्रणालीवर अवलंबून आहेत. ते अधिक सुरक्षित करण्यासाठी ते आधार आणि ओटीपी ऑथेंटिकेशनशी जोडलं जाईल. 

असा करू शकता वापर 

पीएफआरडीए नुसार, आधार बेस्ड लॉग-इन ऑथेंटिकेशन एनपीएस सदस्याच्या यूजर आयडीशी लिंक केली जाईल. यानंतर, आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर मिळालेला ओटीपी एन्टर केल्यानंतर एनपीएस खात्यात लॉग इन केलं जाऊ शकतं. 

अशी वाढेल सुरक्षा 

  • लॉगिन पासवर्ड, आधार ऑथेंटिकेशन आणि मोबाइल OTP द्वारे फक्त आधारच खातं ऑपरेट करू शकेल. इतर कोणीही ते ऑपरेट करू शकणार नाही.
  • लॉगिन प्रक्रियेदरम्यान पाच वेळा चुकीचा पासवर्ड टाकल्यास, खातं लॉक केलं जाईल. पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला नवीन पासवर्ड तयार करावा लागेल.
  • यासाठी, तुम्हाला IPIN साठी विनंती करावी लागेल किंवा पूर्वी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील.
टॅग्स :निवृत्ती वेतनगुंतवणूकआधार कार्ड