हरारे : चलनवाढ तसेच रुपयाची घसरण झाल्याचे आपण नेहमीच ऐकतो किंवा एखाद्या देशातील चलनाची डॉलरच्या तुलनेत फारच घसरण झाली असा बातम्याही आपल्यासमोर येतात; मात्र झिम्बाब्वे डॉलरने याबाबतीत ऐतिहासिक घसरण नोंदविली आहे. एका अमेरिकन डॉलरसाठी ३५ क्वाड्रीलियन (एकावर पंधरा शून्य) झिम्बाब्वेयिन डॉलर मोजण्याची वेळ आली आहे. इतक्या प्रचंड अवमूल्यनानंतर गेली अनेक वर्षे बाजारात फारशी किंमत न उरलेला झिम्बाब्वे डॉलर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.३० सप्टेंबरपासून झिम्बाब्वे डॉलर चलनातून पूर्णत: बाद होणार आहे. वास्तविक २००९ साली आर्थिक मंदीतून जग सावरत असतानाच झिम्बाब्वेमध्ये अमेरिकन डॉलरचा वापर वाढला होता आणि स्थानिक चलन नाममात्र राहिले होते. आता झिम्बाब्वेचे अमेरिकन डॉलर हेच अधिकृत चलन बनविण्यात येणार आहे. १९७० साली झिम्बाब्वेने ऱ्होडेशियन डॉलरचा चलन म्हणून वापर सुरु केला. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झिम्बाब्वे डॉलरचा वापर सुरु करण्यात आला होता. मात्र त्यानंतर वाढती महागाई, चलवाढ, मंदी यामुळे डॉलरच्या तुलनेमध्ये झिम्बाब्वे डॉलरची घसरण होऊ लागली. २००८ मध्ये चलनवाढ ७९६,००,०००,०० टक्के इतकी मोठ्या प्रमाणात झाली. (वृत्तसंस्था)