Join us

याहूच्या भारतातल्या ३०० इंजिनीअर्सची कपात

By admin | Updated: October 8, 2014 15:04 IST

ढासळती आर्थिक परिस्थिती सावरण्याच्या उपायांचा भाग म्हणून याहू या इंटरनेट विश्वातल्या अग्रणी कंपनीने बंगळुरमधील ३०० इंजिनीअर्सना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन टीम
बंगळुर, दि. ८ - ढासळती आर्थिक परिस्थिती सावरण्याच्या उपायांचा भाग म्हणून याहू या इंटरनेट विश्वातल्या अग्रणी कंपनीने बंगळुरमधील ३०० इंजिनीअर्सना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरमधून होणारे काम कॅलिफोर्नियामधील मुख्यालयातून करण्यात येणार असून त्याचा फटका भारतीय इंजिनीअर्सना बसला आहे. अर्थात, भारतामध्ये अनेक नव्या कंपन्या इंटरनेट विश्वामध्ये उदयाला आल्या असून या इंजिनीअर्सना चांगलीच मागणी असल्याचे व कुणालाही फार काळ घरी बसावे लागणार नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
याहूच्या प्रवक्त्यांनी थेट भाष्य करण्यास नकार दिला असला तरी सूत्रांच्या सांगण्यानुसार बंगळुर येथील ८०० इंजिनीअर्सपैकी ३०० जणांना काढण्यात आले आहे, तर काही जणांना अमेरिकेत जाण्यास सांगण्यात आले आहे. कामावरून कमी करण्यात आलेल्या इंजिनीअर्सना सहा महिन्यांचा पगार नुकसानभरपाई म्हणून देण्यात आल्याचे वृत्त आहे. तर ज्या इंजिनीअर्सना अमेरिकेत जाण्यास सांगण्यात आले, परंतु ज्यांची तिकडे जायची इच्छा नव्हती अशांना १२ महिन्यांचा पगार नुकसानभरपाई म्हणून देण्यात आला आहे.
बंगळुरमधील कार्यालय बंद करण्याचा कंपनीचा विचार नसल्याचे अधिका-यांनी सांगितले तसेच हा निर्णय कंपनीची स्थिती भक्कम करण्यासाठी असल्याचे म्हटले आहे. याहूमध्ये एकूण ११,५०० कर्मचारी असून त्यातले २,००० भारतीय होते. परंतु आता भारतीय इंजिनीअर्सची संख्या १,५०० पेक्षा कमी झाल्याचे समजते. भारतातले मुख्यत: इंजिनीअरिंगशी संबंधित काम अमेरिकेमध्ये हलवण्यात येत आहे, त्यादृष्टीने काही निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.