Join us
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांमधील सर्वात वाईट सप्ताह

By admin | Updated: January 11, 2016 03:06 IST

तीन सप्ताह सातत्याने वाढ दाखविल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी गत सप्ताहात गटांगळी खाल्ली. बाजारात पाच दिवस व्यवहार झाले

तीन सप्ताह सातत्याने वाढ दाखविल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी गत सप्ताहात गटांगळी खाल्ली. बाजारात पाच दिवस व्यवहार झाले त्यापैकी चार दिवस निर्देशांक खाली आला. सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी निर्देशांकात वाढ झाल्याने बाजार काहीसा सावरला. या सप्ताहाच्या बंद निर्देशांकाने एकोणावीस महिन्यातील तळ गाठला आहे.मुंबई शेअर बाजारात गत सप्ताहाचा प्रारंभ तेजीने झाला. सप्ताहाभरात संवेदनशील निर्देशांक २६११६.५२ ते २४८२५.७० अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक २४९३४.३३ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकापेक्षा त्यामध्ये १२२६.५७ अंश म्हणजेच ४.६९ टक्क्यांनी घट झाली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ३६१.८५ अंशांनी घसरुन ७६०१.३५ अंशांवर बंद झाला.जानेवारी महिन्याचा पहिलाच आठवडा असतांना निर्देशांकात मोठी घट झाली आहे. निर्देशांकाने एकोणावीस महिन्यातील तळ गाठला आहे. स्मॉल कॅप आणि मिडकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमध्येही घट झाली. संवेदनशील निर्देशांकातील तीस पैकी अठ्ठावीस आस्थापनांचे समभाग खाली येऊन बंद झाले. चीनच्या राष्ट्रीय बँकेने युआन या चलनाचे अवमूल्यन करण्याचा निर्णय जाहीर केला. डॉलरच्या तुलनेत होणारी घसरण थांबविण्यासाठी हा निर्णय घेतला.