नऊ कोटींतून होणार १३१ अंगणवाड्यांची कामे
By admin | Updated: August 16, 2014 22:24 IST
स्थायी समिती बैठक, छत्रपती सभागृह नामकरणाला सापडला मुहूर्त
नऊ कोटींतून होणार १३१ अंगणवाड्यांची कामे
स्थायी समिती बैठक, छत्रपती सभागृह नामकरणाला सापडला मुहूर्तनाशिक : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीला शासनाकडून अंगणवाडी इमारतीची बांधकामे करण्यासाठी नऊ कोटींचा निधी प्राप्त झाला असून, त्यातून किमान १३१ अंगणवाड्यांच्या इमारतींची कामे होणार आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत ही माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी उद्धव खंदारे यांनी दिली. याच बैठकीत गेल्या अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा प्रश्न सुटला असून, कार्यवाही तातडीने करण्याची सूचना अध्यक्ष जयश्री पवार यांनी प्रशासनाला केली. बैठकीच्या सुरुवातीलाच प्रशांत देवरे, केदा अहेर व रवींद्र देवरे यांनी सदस्य प्रा. अनिल पाटील सभागृहात का आले नाहीत, त्यांच्या प्रश्नाची उकल का होत नाही, अशी विचारणा प्रशासनाकडे केली. त्यावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी प्रा. अनिल पाटील यांची जिल्हा परिषदेच्या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याबाबतची मागणी असून, त्यासंदर्भात शासनाला विचारणा केली असता शासनाने स्पष्ट शब्दात नकार कळविल्याचे सांगितले. त्यावर सभापती राजेश नवाळे यांनी आम्ही सिन्नर पंचायत समितीच्या नवीन इमारतीतील सभागृहाला स्व.गोपीनाथ मुंडे यांचे नाव दिले असून, शासनाच्या परवानगीसाठी प्रस्ताव मागविल्याचे सांगितले. त्यावर जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीतील सभागृहाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देता येणार नाही. मात्र जुन्या इमारतीतील सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे, शासनाने विचारणा केल्यावर त्याबाबत नंतर निर्णय घेण्यात येईल, असे आदेश अध्यक्ष जयश्री पवार यांनी प्रशासनाला दिले. उपाध्यक्ष संपतराव सकाळे यांनी उपअभियंता असताना शाखा अभियंत्याकडे का पदभार दिला, अशी विचारणा प्रशासनाला केली. त्यावर जयश्री पवार यांनी असे झाले असेल, तर त्याबाबत माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे उत्तर दिले. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांबाबत चर्चा होऊन शिक्षकांना आदिवासीच नव्हे, तर बिगर आदिवासी भागातील रिक्त जागांवर नियुक्ती देण्यात यावी, अशी सूचना सदस्यांनी केली. त्यानंतर आरोग्य विभागातील वादग्रस्त कर्मचारी चंद्रकांत वैष्णव याच्या निलंबनाबाबत रवींद्र देवरे यांनी प्रश्न उपस्थित केला. वैष्णव याने वरिष्ठांच्या सूचनांचे पालन न करता उद्धट वर्तवणूक केल्यानेच त्याचे निलंबन करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिली. बैठकीस सदस्य प्रवीण जाधव, शंकर खैरे आदि उपस्थित होते.(प्रतिनिधी)