Join us

महिला संचालक नेमण्यात कंपन्यांकडून चालढकल

By admin | Updated: March 29, 2015 23:25 IST

नोंदणीकृत ४०० कंपन्यांनी आपल्या संचालक मंडळात एकाही महिलेचा २५ मार्चपर्यंत समावेश केलेला नाही

नवी दिल्ली : नोंदणीकृत ४०० कंपन्यांनी आपल्या संचालक मंडळात एकाही महिलेचा २५ मार्चपर्यंत समावेश केलेला नाही. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड आॅफ इंडियाने (सेबी) अशी नियुक्ती करण्यास कंपन्यांना मुदत वाढवून ३१ मार्च २०१५ ही शेवटची तारीख दिली होती. अशी नियुक्ती न करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही सेबीने दिलेला आहे.मुदत संपत येत असताना अनेक कंपन्यांकडून महिला संचालिकेची नियुक्ती केली जाऊ शकते. अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळाची बैठक येत्या दोन दिवसांत होणार आहे. या आठवड्यात हीरो मोटोकॉर्प, बजाज आटो, टाटा इंटरनॅशनलसह किमान ५० नोंदणीकृत कंपन्यांनी संचालक मंडळात महिलेची नियुक्ती केली आहे. काही छोट्या आणि मिडकॅप कंपन्या आपल्या संचालक मंडळात महिलेची नियुक्ती करीत आहेत. मुदत वाढवून व वारंवार इशारे देऊनही ३९५ नोंदणीकृती कंपन्यांनी २५ मार्चपर्यंत संचालक मंडळात किमान एकाही महिलेची नियुक्ती केलेली नाही. सेबीने आता ही मुदत वाढवून द्यायची नाही, असे ठरविले आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये सेबीने दिलेल्या आदेशानुसार आॅक्टोबरअखेर ही नियुक्ती करायची होती. ती मुदत नंतर मार्चअखेर वाढविण्यात आली होती.