Join us  

हजारो नोक-यांवर कु-हाड, अनिल अंबानींची RCom बंद करणार वायरलेस सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 8:46 PM

अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन (आरकॉम) कंपनी वायरलेस बिजनेस, डीटीएच बिझनेस आणि 2-जी बिझनेस बंद करणार आहे

नवी दिल्ली - अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन  (आरकॉम)  कंपनी वायरलेस बिजनेस सेवा बंद करणार असल्याचं वृत्त आहे. 30 नोव्हेंबरपर्यंतच तुम्ही कंपनीचे कर्मचारी आहात अशी माहिती आरकॉमने आपल्या कर्मचा-यांना केली आहे असं वृत्त इकोनॉमिक टाइम्सने दिलं आहे. या रिपोर्टनुसार विविध कारणांव्यतिरिक्त मुकेश अंबानींच्या जिओद्वारे मोफत कॉलिंग आणि स्वस्त इंटरनेटचा आरकॉमच्या व्यवहारावर परिणाम झाल्याचं कंपनीने म्हटलंय. 

वायरलेस बिझनेस बंद करण्याचा निर्णय कंपनीला घ्यावा लागत आहे असं 24 ऑक्टोबरला आरकॉमचे सीईओ आणि कार्यकारी निदेशक गुरदीप सिंह यांनी कर्मचा-यांना सांगितलं. आजपासून तीस दिवसांत वायरलेस बिझनेस बंद होईल , सर्व प्रयत्न करूनही आपण 30 दिवसांपेक्षा जास्त दिवस हा बिझनेस सुरू ठेवणं शक्य नाही असं ते म्हणाले. या वृत्तानुसार गुरदीप सिंह म्हणाले, कंज्युमर वॉइस,  4-जी डोंगल पोस्ट-पेडआणि आयएलडी वाइस या सेवा सध्या सुरूच राहतील.  याशिवाय इतर सेवा बंद होतील. जो पर्यंत या सेवांमुळे फायदा होत असेल तोपर्यंतच या सेवाही सुरू राहतील. 

21 नोव्हेंबर रोजी कंपनीच्या डीटीएच लायसन्सची मुदत संपत असून कंपनीने लायसन्सचं नुतनीकरण न करण्याचा निर्णय घेतल्याचं या वृत्तात म्हटलं आहे . त्यामुळे डीटीएच बिझनेसमधूनही कंपनी काढता पाय घेणार आहे. कंपनी  2-जी बिझनेस देखील बंद करणार असून केवळ 3-जी आणि4- जी बिझनेसवरच कंपनी लक्ष केंद्रीत करणार आहे.   

टॅग्स :अनिल अंबानीरिलायन्स कम्युनिकेशन