Join us  

'अझीम प्रेमजींनी नोकरी देण्यास दिलेला नकार..,' नारायण मूर्तींनी सांगितलं कशी उभी राहिली Infosys 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 10:37 AM

इन्फोसिस (Infosys) ही आज देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे, पण तिची सुरू होण्याची कहाणी खूप रंजक आहे.

इन्फोसिस (Infosys) ही आज देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी आहे, पण तिची सुरू होण्याची कहाणी खूप रंजक आहे. एन.आर. नारायण मूर्ती (N.R. Narayana Murthy) यांनी त्यांच्या पत्नीकडून १०,००० रुपये घेऊन आपल्या सहा मित्रांसोबत ही फर्म सुरू केली. तुम्ही हे अनेकवेळा ऐकलं आणि वाचलंही असेल, पण इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी स्वत: याच्या सुरू होण्यामागचं आणखी एक मोठं कारण उघड केलं आहे आणि त्यांनी यामागचे श्रेय अब्जाधीश अझीम प्रेमजी (Azim Premji) यांना दिलंय. 

आयटी कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांच्यामुळे इन्फोसिस कशी अस्तित्वात आली आणि आज देशातील टॉप-३ आयटी कंपन्यांमध्ये तिचा समावेश कसा झाला आहे, हे नारायण मूर्ती यांनी सांगितलं. बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार त्यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर भाष्य केलं आहे. जेव्हा ते नोकरीच्या शोधात होते, तेव्हा त्यांनी विप्रोकडे अर्ज केला होता, परंतु अझीम प्रेमजींच्या कंपनीनं त्यांना नोकरी देण्यासाठी नकार दिला होता, असं त्यांनी सांगितलं.

इन्फोसिसपूर्वी काय केलं?

नारायण मूर्ती यांनी पहिली नोकरी आयआयएम अहमदाबाद येथे रिसर्च असोसिएट म्हणून केली. तिथे त्यांनी चीफ सिस्टम प्रोग्रामर म्हणून काम सुरू केलं. इन्फोसिस अस्तित्वात येण्यापूर्वी त्यांनी सॉफ्टट्रॉनिक्सची स्थापना केली, परंतु त्यांची कंपनी यशस्वी होऊ शकली नाही. ती बंद झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील पटनी कॉम्प्युटर सिस्टीममध्ये नवीन नोकरी सुरू केली. यावेळी त्यांनी विप्रोमध्ये नोकरीसाठी अर्ज केला होता, पण त्यांना तिकडे नोकरी मिळाली नाही.

अझीम प्रेमजींनी मान्य केलेली चूक

मूर्ती यांनी पुढे खुलासा केला की विप्रोनं त्यांचा नोकरीचा अर्ज नाकारला होता, ज्यामुळे इन्फोसिसचा जन्म झाला. जी आता आयटी उद्योगातील विप्रोच्या प्रमुख प्रतिस्पर्ध्यांपैकी एक आहे. यादरम्यान त्यांनी हे देखील सांगितलं की विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी नंतर सांगितलं होतं की त्यांना कामावर न घेणं ही त्यांची सर्वात मोठी चूक होती. नारायण मूर्ती यांच्या म्हणण्यानुसार, जर त्यांना त्यावेळी विप्रोमध्ये कामावर घेतलं असतं, तर त्यांच्या आणि अझीम प्रेमजी यांच्यासाठी परिस्थिती वेगळी असती.

आज इन्फोसिसचं मार्केट कॅप (Infosys MCap) ६.६५ कोटी रुपये आहे आणि कंपनीचा व्यवसाय अमेरिका, ब्रिटनसह जगातील अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. एवढंच नाही तर देशातील टॉप-१० व्हॅल्युएबल कंपन्यांमध्ये इन्फोसिसचाही समावेश आहे. दुसरीकडे, विप्रोचं मार्केट कॅप (Wipro MCap) २.४३ लाख कोटी रुपये आहे.

टॅग्स :इन्फोसिसविप्रोअझिम प्रेमजी