Join us

बाजाराची चाल करणार का श्रीमंत?

By प्रसाद गो.जोशी | Updated: May 8, 2023 08:13 IST

गतसप्ताहामध्ये जाहीर झालेली पीएमआयची आकडेवारी तसेच जीएसटी संकलन हे चांगले आल्याने बाजाराने त्यावर चांगली प्रतिक्रिया दिली.

प्रसाद गो. जोशी

परकीय वित्तसंस्थांच्या चांगल्या कामगिरीनंतरही एचडीएफसीच्या निकालांनी बाजाराची निराशा केल्याने गतसप्ताह काहीसा निराशेचा गेला मात्र आगामी सप्ताहात भारतासह अमेरिकेतील चलनवाढीची आकडेवारी आणि कंपन्यांचे निकाल हे बाजाराची दिशा ठरविणारे असतील. त्याचबरोबर कच्च्या तेलाची किंमतही बाजाराची दिशा ठरविणार आहे.

भाव गगनाला तरीही सोन्याची आयात २४ टक्क्यांनी घटली, ग्राहकांची दागिने खरेदीकडे पाठ

गतसप्ताहामध्ये जाहीर झालेली पीएमआयची आकडेवारी तसेच जीएसटी संकलन हे चांगले आल्याने बाजाराने त्यावर चांगली प्रतिक्रिया दिली. मात्र एचडीएफसीच्या दोन्ही कंपन्यांच्या निकालांनी बाजाराची निराशा केल्यामुळे बाजार घसरला. 

आगामी सप्ताहामध्ये अनेक कंपन्यांचे जाहीर होणारे तिमाही निकाल महत्त्वाची भूमिका बजावतील. पण सर्वात महत्त्वाचे राहणार आहे ती चलनवाढीची आकडेवारी. भारत तसेच अमेरिकेतील चलनवाढीची आकडेवारी या सप्ताहामध्ये जाहीर होणार आहे. यावरून आगामी काळातील व्याजदर ठरण्याची शक्यता असल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.

गुंतवणूकदार २ लाख कोटींनी श्रीमंत

बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांच्या एकूण भांडवल मूल्यामध्ये १ लाख ९५ हजार ७८९.६८ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांमुळेच बाजाराच्या भांडवल मूल्यामध्ये वाढ झाली आहे.

परकीय वित्तसंस्था सक्रिय

गतसप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातील आपली खरेदी चालू ठेवली. या संस्थांनी सप्ताहामध्ये ५५२७ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. तरीही सेन्सेक्स घटला, हे विशेष होय. याआधी मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये या संस्थांनी भारतीय बाजारामध्ये खरेदी केल्याचे दिसून आले.

टॅग्स :व्यवसाय