Join us  

रेडिमेड कपडे स्वस्त होणार? कॉटनच्या किमतीत २० टक्के घसरण झाल्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 1:51 PM

२०२२ च्या अखेरपर्यंत देशात कॉटनचा दर ३० हजार रुपयांच्या खाली येण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : देशांतर्गत आणि विदेशी बाजारांमध्ये कॉटनच्या वाढलेल्या किमतीचा काळ संपण्याच्या मार्गावर आहे. गेल्या एका महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात कॉटनच्या किमतीत २० टक्क्यांपेक्षा अधिक घसरण झाली असून, देशातही कॉटनची किंमत १० टक्क्यांनी घसरली आहे. त्यामुळे लवकरच रेडिमेड कपडे स्वस्त होणार असून, सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.२०२२ च्या अखेरपर्यंत देशात कॉटनचा दर ३० हजार रुपयांच्या खाली येण्याची शक्यता आहे. तर विदेशी बाजारात कॉटनचे दर घसरून जवळपास ४५ हजार रुपयांच्या स्तरावर येण्याची शक्यता आहे. यामुळे कॉटन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होत कपडे स्वस्त होणार आहेत.सध्या कॉटनच्या दरात घसरणीनंतर कापूस आणि सुती धाग्यांची मागणी कमी झाली असून त्याला खरेदीदार मिळत नाहीयेत. वायदा बाजारातही कॉटनच्या किमतीत घसरण झाली आहे. याअगोदर कॉटनच्या वाढलेल्या प्रचंड किमतीमुळे कपडे तयार करणाऱ्यांनी उत्पादन कमी केले होते. सध्या आर्थिक मंदीच्या भीतीने मागणीही अतिशय कमी आहे.

कशामुळे होतेय दरात घसरण? मागणीमध्ये झालेली घसरण, रुपयाच्या तुलनेत रुपयाने खाल्लेली गटांगळी, कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता तसेच जगभरात मंदी येण्याची भीती यामुळे कॉटनच्या किमतीमध्ये घसरण झाली आहे. किमतीवरील हा दबाव पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. पाउस कमी झाला तर मात्र कापसाचे उत्पादन कमी होउन दर वाढण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची किंमतजुलै - ६०,१००ऑक्टाेबर - ६६,६००डिसेंबर - ५९,६२५(प्रति कँडी किंमत रुपयात, १ कँडी : ३५६ किलोग्रॅम)

निर्यात घटली, आयात वाढीची शक्यता- २०२१-२२ मध्ये मे २०२२ पर्यंत भारताने ३८ लाख गाठी कॉटन निर्यात केला आहे. - तर एक वर्षापूर्वी याच काळात ५८ लाख गाठी निर्यात केल्या. - या वर्षी भारताची कॉटन निर्यात ४२ लाख गाठींपर्यंत मर्यादित राहण्याची शक्यता आहे. - भारतीय व्यापाऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांत - ५ लाख गाठी आयात केल्या आहेत.

- ९०हजार रुपये उत्तम दर्जाच्या कॉटनची किंमत सध्या भारतात. एप्रिलमध्ये ही किंमत १ लाखांच्या पुढे गेली होती.

- ३७% - जागतिक बाजारात कॉटनच्या किमतीमध्ये गेल्या दोन महिन्यांत घसरण झाली 

- १५% घसरण गेल्या एका महिन्यात सुती धाग्यामध्ये झाली  

- ३६० किलोग्रॅमवर पोहोचली ३० सीसीएच धाग्याची किंमत. यापूर्वी किंमत ४२० रुपये होती. 

टॅग्स :व्यवसायकापूस