प्रसाद जोशी: जागतिक बाजाराचा कल, शुल्काशी संबंधित घडामोडी, परदेशी गुंतवणूकदारांच्या हालचाली हे घटक आठवड्यात बाजाराची दिशा ठरवतील. गेल्या आठवड्यात बाजारात उसळी घेतली. परकीय वित्तसंस्थांच्या खरेदीच्या जोडीलाच देशांतर्गत वित्तसंस्थांची खरेदी व डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यांमध्ये वाढीमुळे शेअर बाजाराला गती मिळाली. बाजाराचे सर्वच निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झाले. मिडकॅप, स्मॉलकॅपमध्ये चांगली वाढ झाली.
परकीय वित्तसंस्थांकडून ५८१९.१२ कोटींची खरेदी
गेले १३ सप्ताह सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी पुन्हा एकदा शेअर बाजारात खरेदीला प्रारंभ केला आहे. या सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी ५८१९.१२ कोटींचे समभाग खरेदी केले आहेत. परकीय वित्तसंस्थांच्या खरेदीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण दिसून आले.
गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम
परदेशी गुंतवणूकदरांचा ओघ असाच कायम राहण्याची चिन्हे आहेत. गुंतवणूकदारांचे लक्ष डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या स्थितीकडे आणि जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतींकडे देखील असणार आहे. सर्वांचे लक्ष मार्चच्या डेरिव्हेटिव्ह करारांच्या सेटलमेंट आणि एफआयआयच्या हालचालींवर असेल. शुल्काशी संबंधित घडामोडी व जीडीपी वाढीच्या दराचे आकडे गुंतवणूकदारांच्या मानसिकतेवर परिणाम करतील.