Join us

कमी करांची आधुनिक पद्धती राबविणार- जेटली

By admin | Updated: April 18, 2015 00:06 IST

जागतिक पातळीवर स्पर्धात्मक आणि कमी दराची आधुनिक कर पद्धत राबविण्याचे आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विदेशी गुंतवणूकदारांना दिले.

वॉशिंग्टन : जागतिक पातळीवर स्पर्धात्मक आणि कमी दराची आधुनिक कर पद्धत राबविण्याचे आश्वासन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी विदेशी गुंतवणूकदारांना दिले. विदेशी गुंतवणूकदारांकडून पूर्वलक्षी प्रभावाने कर वसुली केली जाणार नाही आणि करदाते हे भागीदार आहेत असे समजले जातील. ओलीस नव्हे, अशा शब्दांत जेटली यांनी दिलासा दिला.गुरुवारी रात्री जेटली पिटरसन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल इकॉनॉमिक्समध्ये बोलत होते.देशातील करदात्यांसाठीही कर हे कमीच हवेत. करदात्यांकडील पैसा जबरदस्तीने सरकारच्या तिजोरीत जातो, असे समजले जाते; परंतु आपण सरकारचे अंग आहोत असे प्रत्येकाला वाटले पाहिजे व त्यासाठीच कराचे जाळे विस्तारलेले हवे. कराच्या पूर्वलक्षी प्रभावाने वसुलीबाबत व्यक्त झालेली काळजी, कर वसुलीसाठी छळ आणि कर प्रशासनातील मनमानीबद्दल मला तीव्र जाणीव आहे, असे जेटली म्हणाले. जेटली यांनी पारदर्शी आणि अंदाजयोग्य कर पद्धती राबविण्यासाठी सरकार बांधील असल्याचे सांगितले. हा आमचा केवळ विचार नसून तो आम्ही प्रत्यक्षात राबविला आहे. दावे, खटले कमी होतील यासाठी आम्ही अनेक पावले उचलली आहेत व नेहमीच्या प्रकरणात क्षुल्लक कारणासाठी खटले दाखल करू नका, असे आम्ही अधिकाऱ्यांना सांगितले आहे. शेल आणि व्होडाफोनच्या बाजूने उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सरकारने त्याला आव्हान दिले नाही, असे जेटली म्हणाले. आम्ही पारदर्शी आणि अंदाजयोग्य कर पद्धतीला बांधील आहोत हे मला पुन्हा एकदा ठासून सांगायचे आहे. पूर्वलक्षी प्रभावाने कर वसुली केली जाणार नाही. आधुनिक कर पद्धतीची आपली कल्पना विशद करताना अरुण जेटली म्हणाले की, ‘‘कर धोरण आणि प्रशासन यांची कृती ही परस्परपूरक असली पाहिजे. त्यांनी पारदर्शी पद्धतीने, किमान विशेषाधिकाराने व करदात्याला न छळता काम केले पाहिजे. आम्ही कराचे दर स्पर्धात्मक व आंतरराष्ट्रीय पातळीच्या जवळ जाणारे ठेवू, असेही ते म्हणाले.