Join us

संडेचं नाव बदलून सन ड्युटी का करू नये? हर्ष गोयंकांनी L&T च्या अध्यक्षांना लगावला टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 08:57 IST

स्पर्धेत टिकून राहण्यासाठी रविवारच्या दिवशीही ऑफिसात येऊन काम करणं गरजेचं आहे, असं वक्तव्य लार्सन अँड टुब्रोचे (एलअँडटी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन. सुब्रमण्यन यांनी केलं. यानंतर अनेक स्तरातून त्यांच्या वक्तव्यावर टीका करण्यात आली.

‘तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या बायकोचं तोंड किती वेळ बघू शकता? बायका आपल्या नवऱ्यांची तोंडे किती वेळ पाहू शकतात? ऑफिसला या आणि काम सुरू करा. कर्मचाऱ्यांनी आठवड्यात ९० तास काम करायला हवे; स्पर्धेत टिकून राहण्यासाठी रविवारच्या दिवशीही ऑफिसात येऊन काम करणं गरजेचं आहे, असं वक्तव्य लार्सन अँड टुब्रोचे (एलअँडटी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन. सुब्रमण्यन यांनी केलं. यानंतर त्यांना अनेक टीकांचा सामना करावा लागला. दरम्यान, आता आरपीजी एन्टरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी सुब्रमण्यन यांना जोरदार टोला लगावलाय.

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आठवड्याला ९० तास? मग संडेला ‘सन-ड्युटी’च म्हणा. ‘सुट्टी’ ही संकल्पना फक्त एक दंतकथा ठरवा! मेहनत आणि स्मार्ट वर्क करण्यावर माझा विश्वास आहे. पण आयुष्य म्हणजे अखंड ऑफिस शिफ्ट बनवणं? हा यशाचा फॉर्म्युला नाही. वर्क-लाईफ बॅलन्स आवश्यकच आहे, अखेर हा माझा विचार आहे. #वर्कस्मार्टनॉटस्लेव। असं म्हणत हर्ष गोयंकानी सुब्रमण्यन यांना टोला लगावला.

चिनी व्यक्तीचं उदाहरण

आपलं म्हणणं मांडण्याठी सुब्रमण्यन यांनी एका चिनी व्यक्तीशी केलेल्या संभाषणातील एक किस्सा यावेळी सांगितला. "त्या व्यक्तीनं असा दावा केला की चीन अमेरिकेला मागे टाकू शकतो कारण चिनी कामगार दर आठवड्याला ९० तास काम करतात तर अमेरिकन ५० तास काम करतात. त्यामुळे तुमच्यासाठी हेच उत्तर आहे. जर तुम्हाला जगात अव्वल स्थान मिळवायचे असेल, तर तुम्हाला आठवड्यातून ९० तास काम करावं लागेल. मित्रांनो, चला कामाला लागा," असं एस एन सुब्रमण्यन म्हणाले.

कंपनीनं दिलं स्पष्टीकरण

सुब्रमण्यन यांच्या वक्तव्याचा एल अँड टी कंपनीने सर्व बाजूंनी बचाव केला आहे. "हे दशक भारताचं आहे असा आमचा विश्वास आहे. ज्यासाठी अधिक प्रगती करण्यासाठी आणि विकसित राष्ट्र बनण्याचं आमचं स्वप्न साकार करण्यासाठी सामूहिक समर्पण आणि प्रयत्नांची आवश्यकता आहे," अशी प्रतिक्रिया एल अँड टीच्या प्रवक्त्यानं दिली. अध्यक्षांच्या या वक्तव्यातून या महान महत्त्वाकांक्षेचं प्रतिबिंब दिसून येतं. विलक्षण परिणामांसाठी विलक्षण प्रयत्नांची आवश्यकता असते यावर भर दिला असल्याचं त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :व्यवसायनोकरी