Join us
Daily Top 2Weekly Top 5

घाऊक महागाई चार वर्षांच्या उच्चांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:31 IST

घाऊक क्षेत्राचा जून महिन्यातील महागाईचा दर ५.७७ टक्क्यांवर गेला असून, हा चार वर्षांचा उच्चांक ठरला आहे.

नवी दिल्ली : घाऊक क्षेत्राचा जून महिन्यातील महागाईचा दर ५.७७ टक्क्यांवर गेला असून, हा चार वर्षांचा उच्चांक ठरला आहे. इंधनाच्या दरात वाढ झाल्यामुळे महागाईतील ही वाढ झाली आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जूनमधील महागाईचा दर डिसेंबर २0१३ (५.९ टक्के) नंतरचा उच्चांकी दर ठरला आहे. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर मे महिन्यात ४.४३ टक्के, तर गेल्या वर्षीच्या जूनमध्ये 0.९0 टक्के होता. किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर जूनमध्ये ५ टक्के झाला होता. हा ५ महिन्यांचा उच्चांक ठरला होता.महागाई ४ टक्क्यांवर नियंत्रित ठेवण्याचे उद्दिष्ट रिझर्व्ह बँकेला देण्यात आलेले आहे. त्यामुळे आगामी पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेवर दबाव राहील, असे सूत्रांनी सांगितले. जूनमध्ये खाद्यक्षेत्रातील महागाईचा दर १.८0 टक्के झाला. आदल्या महिन्यात तो १.६0 टक्के होता. भाजीपाल्याचा महागाई दर २.५१ टक्क्यांवरून थेट ८.१२ टक्के झाला.