Join us  

घाऊक क्षेत्रातील महागाई ६ महिन्यांच्या नीचांकावर! अन्नधान्याच्या किमती घटल्या, भाजीपाल्याचे दर मात्र चढेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 4:03 AM

घाऊक किमतींवर आधारित महागाईचा दर जानेवारीत २.८४ टक्क्यांवर घसरला असून, हा सहा महिन्यांचा नीचांक ठरला आहे. भाजीपाल्याच्या किमती चढ्याच असल्या तरी अन्नधान्य स्वस्त झाल्यामुळे महागाईचा दर खाली आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

नवी दिल्ली : घाऊक किमतींवर आधारित महागाईचा दर जानेवारीत २.८४ टक्क्यांवर घसरला असून, हा सहा महिन्यांचा नीचांक ठरला आहे. भाजीपाल्याच्या किमती चढ्याच असल्या तरी अन्नधान्य स्वस्त झाल्यामुळे महागाईचा दर खाली आला आहे, असे सूत्रांनी सांगितले.घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई निर्देशांक डिसेंबर २०१७मध्ये ३.५८ टक्के होता. जानेवारी २०१७मध्ये तो ४.२६ टक्के होता. यंदाच्या जानेवारीत तो २.८४ टक्के झाला आहे. सहा महिन्यांतील हा नीचांक ठरला आहे. याआधीचा नीचांकी दर गेल्या वर्षी जुलैमध्ये १.८८ टक्के होता.सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारीत अन्नधान्याची महागाई घसरून ३ टक्के झाली आहे. डिसेंबर २०१७मध्ये ती ४.७२ टक्क्यांवर होती. भाजीपाल्याची महागाई जानेवारीत ४०.७७ टक्के राहिली. आदल्या महिन्यात ती ५६.४६ टक्के होती. जानेवारीत कांद्याच्या किमती १९३.८९ टक्क्यांनी वाढल्या. डाळीचे भाव मात्र कमालीचे उतरले आहेत. डाळींच्या किमतींत ३०.४३ टक्क्यांनी संकोच (डिफ्लेशन) झाला आहेत. गहू आणि डाळींचे भाव अनुक्रमे ६.९४ टक्क्यांनी आणि १.९८ टक्क्यांनी वाढले.प्रथिनयुक्त पदार्थांपैकी अंडी, मांस आणि मासे यांची महागाई ०.३७ टक्क्यांवर राहिली. फळांचा महागाईचा दर ८.४९ टक्के राहिला.इंधन क्षेत्रातील महागाई ४.०८ टक्के राहिली. वस्तू उत्पादन क्षेत्रात हा दर २.७८ टक्के राहिला. रिझर्व्ह बँकेने या आठवड्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, किरकोळ क्षेत्रातील महागाई ५.०७ टक्क्यांवर होती. धोरणात्मक व्याज दर ठरविण्यासाठी रिझर्व्ह बँक किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर विचारात घेते. गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने व्याज दर ‘जैसे थे’ ठेवले होते. जानेवारी-मार्च या तिमाहीत किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर ५.१ टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने व्यक्त केला होता. एप्रिल-सप्टेंबर या सहामाहीत महागाईचा दर ५.१ ते ५.६ टक्के राहील, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले होते. दरम्यान, नोव्हेंबरच्या महागाईची आकडेवारी अनुमानित ३.९३ टक्क्यांवरून ४.०२ टक्के अशी दुरुस्ती करण्यात आली आहे.

टॅग्स :व्यवसायभाज्या