Join us

‘पोलाद उद्योगाला पूर्ण मदत करणार’

By admin | Updated: April 1, 2016 03:51 IST

टाटा स्टीलने ब्रिटनमधील आपला प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे निर्माण झालेल्या संकटग्रस्त परिस्थितीत ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी गुरुवारी तातडीची बैठक

लंडन : टाटा स्टीलने ब्रिटनमधील आपला प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे निर्माण झालेल्या संकटग्रस्त परिस्थितीत ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी गुरुवारी तातडीची बैठक घेतली. पोलाद उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी आपले सरकार शक्य ती सर्व मदत करील, अशी ग्वाही त्यांनी दिली. ब्रिटनमधील प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय बुधवारी टाटाने जाहीर केला होता. त्यामुळे ब्रिटनमधील तब्बल ४0 हजार लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. या निर्णयानंतर डेव्हिड कॅमेरॉन यांनी आपला स्पेन दौरा अर्धवट सोडून मायदेशी धाव घेतली. त्यानंतर गुरुवारी त्यांनी तातडीची मंत्रिमंडळ बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी सांगितले की, हजारो लोकांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी आम्ही हरतऱ्हेचे प्रयत्न करू. शक्य होईल ती मदतही करू. तथापि, परिस्थिती अशी आहे की, आम्ही प्रयत्नांच्या यशस्वीतेची ग्वाही देऊ शकत नाही. बुडणाऱ्या प्रकल्पाचे राष्ट्रीयीकरण करणे हा समाधानकारक तोडगा असू शकत नाही. तथापि, सरकार सध्या कोणतीही गोष्ट नाकारीत नाही.१00 अब्ज डॉलरचे मूल्य असलेल्या टाटा समूहाने ब्रिटनमधील कोरस ही कंपनी काही वर्षांपूर्वी विकत घेतली होती. गेल्या १२ महिन्यांपासून मात्र या कंपनीची आर्थिक स्थिती बिघडत गेली. आता ही कंपनी पूर्णत: आजारी झाली आहे. यावर मात करण्यासाठी कंपनीच्या विक्रीसह सर्व पर्याय खुले असल्याचे टाटाने म्हटले आहे.