रूपेश खैरी, वर्धापावसाच्या दडीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना गेल्या दोन दिवसांपासून आलेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. पाऊस उघडताच शेतकऱ्यांना युरियाची गरज भासणार आहे. मात्र राज्यात अमरावती, यवतमाळ व वर्धा हे तीन जिल्हे वगळता एकाही जिल्ह्णात युरिया नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या उभी ठाकली आहे. शेतातील पिकांची वाढ होण्याकरिता शेतकरी इतर खतांपेक्षा युरियाचाच जास्त वापर करीत आले आहेत. त्यांना ते आर्थिक दृष्ट्याही परवडणारे आहे. त्यांची ही पद्धत यंदाही कायम राहणार यात शंका नाही. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांनी पिकांना खत देण्याकडे जरा दुर्लक्ष केले होते. अशात पाऊस आल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पिकांना युरिया देण्याकडे शेतकऱ्यांचा कल राहणार आहे; मात्र कृषी केंद्रातून युरिया मिळत नसल्याने त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कृषी विभागाच्यावतीने प्रत्येक जिल्ह्णात आवश्यक संख्येनुसार त्यांचे आवंटन राज्यामार्फत केंद्राकडे पाठविण्यात आले आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप युरिया उपलब्ध झाला नसल्याने राज्यातच मागणीच्या तुलनेत तो आला नसल्याचे वास्तव आहे. परिणामी जिल्ह्णातील कृषी विभागाकडे तो पोहोचला नाही. यामुळे शेतकऱ्यांना युरिया मिळणे कठीण झाले आहे. कुठेच नसल्याने समस्येत भर पडत आहे.
युरिया कुठे मिळेल ? पाऊस उघडताच भासणार गरज
By admin | Updated: September 11, 2014 02:36 IST