Join us

एलबीटी केव्हा रद्द होणार?

By admin | Updated: December 16, 2014 23:44 IST

- व्यापारी संघटनांची मागणी : आता उरले सहा दिवस

- व्यापारी संघटनांची मागणी : आता उरले सहा दिवस
नागपूर : सत्तेवर येताच राज्यातून एलबीटी हद्दपार करू, अशी घोषणा देणाऱ्या भाजपाने प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर मात्र या मुद्यावर प्रारंभी यू टर्न घेतला होता. जीएसटी लागू होईपर्यंत एलबीटी हटविला जाणार नाही, असेही म्हटले होते. पण सोमवारी विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एलबीटी हटविण्याची घोषणा केल्यानंतर, गेल्या काही दिवसांपासून चिंतेत असलेल्या व्यापाऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. एका महिन्यात एलबीटी रद्द करण्याच्या ना. नितीन गडकरी यांच्या घोषणेला आता सहा दिवस उरले आहेत. चार ते पाच दिवसात एलबीटी रद्द होईल, अशी अपेक्षा व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना आहे.

लवकरच घोषणा अपेक्षित
भाजपाने निवडणुकीच्या घोषणापत्रात नमूद केल्यानुसार भाजपने सत्तेवर येताच एलबीटी रद्द करायला हवा होता. उशीर झाला असला तरीही येत्या चार ते पाच दिवसात विधिमंडळात घोषणा होण्याची अपेक्षा आहे. व्यापारी कर भरण्यास तयार आहे. पण त्यांना किचकट प्रक्रिया नको. अधिवेशनाआधी मनपाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक टाकलेल्या धाडीमुळे व्यापारी त्रस्त आहेत. एलबीटी रद्द झाल्यानंतर येणारा पर्यायी कर सरळसोपा असावा.
मयूर पंचमतिया, अध्यक्ष
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.

कारवाई थांबवा
एलबीटीच्या नावाखाली अनावश्यक कारवाई करून व्यापाऱ्यांना जेरीस आणले आहे. छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना नोटीस पाठवून त्यांच्याकडून पाच हजारांचा दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे व्यापारी त्रस्त आहेत. आता एकमुश्त करप्रणाली असावी. घोषणेनुसार मुख्यमंत्री एलबीटी रद्द करण्यासाठी तातडीने निर्णय घेतील, असा विश्वास आहे. त्यामुळे इन्स्पेक्टर राजपासून मुक्तता मिळेल. अधिवेशनात एलबीटी रद्द होण्याची अपेक्षा आहे.
सचिन पुनियानी, सहसचिव,
नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स.