नवी दिल्ली : अवकाळी पावसाने देशाच्या काही भागातील पिकांचे नुकसान होऊनही यावर्षी गव्हाचे उत्पादन २०१३-१४ पेक्षा अधिक होऊ शकते, किंबहुना विक्रमी उत्पादनाची शक्यता आहे, असे कृषी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. २०१३-१४ मध्ये गव्हाचे ९.५९ कोटी टन उत्पादन झाले होते. येथील पुसा कृषी विज्ञान मेळाव्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना कृषी सचिव सिराज हुसैन म्हणाले की, जर सध्याचे कमी तापमान कायम राहिले आणि या महिन्यात पाऊस पडला नाही तर देशात गव्हाच्या उत्पादनाचा नवा विक्रम होऊ शकतो. भारत जगातील दुसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे. मंत्रालयाने गेल्या महिन्यात वर्तविलेल्या अंदाजात २०१४-१५चे गव्हाचे उत्पादन ९.५८ कोटी टन राहू शकते, असे म्हटले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी काहीसे कमी उत्पादन हाती येण्याचा अंदाज कृषी विभागाने तेव्हा व्यक्त केला होता. मात्र, कृषी विभागाला आता गहू उत्पादन वाढण्याची शक्यता दिसत आहे. हुसैन म्हणाले की, केवळ काही क्षेत्रातच गव्हाचे नुकसान झाले आहे. सध्या तापमान कमी असून ते गव्हासाठी पोषक आहे. त्यामुळे गव्हाचे उत्पादन वाढेल. यावर्षी गहू उत्पादनाचा नवा विक्रम प्रस्थापित करेल, असा मला विश्वास आहे. यावर्षी गव्हाचे उत्पादन खूप चांगले राहील आणि ते गेल्या वर्षीपेक्षा अधिक असू शकते, असा माझा स्वत:चा अंदाज आहे. संसदेसमोर ठेवलेल्या आकडेवारीनुसार, अवकाळी पावसामुळे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगालमधील ५० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे.
अवकाळीच्या संकटानंतरही गहू उत्पादन वाढणार
By admin | Updated: March 10, 2015 23:55 IST