पुणे : टाटा मोटर्सने ‘डिझेल नॅनो’ची योजना तूर्त थंड बस्त्यात टाकली आहे. कारमधील फेरबदल व आर्थिक दृष्टिकोनातून कंपनीने नजीकच्या काळात डिझेल नॅनोचे उत्पादन न करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी लवकरच झेन-एक्स नॅनो सादर करील, अशी आशा आहे. कंपनीने २ सिलिंडरचे ८०० सीसीसी डिझेल इंजिन विकसित केले आहे. हे इंजिन नॅनोत बसविण्यात येईल, असा अंदाज लावला जात होता; मात्र कंपनीने तूर्तास या इंजिनचा उपयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा मोटर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष गिरीश वाघ यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, वाहनात फेरबदल हे एक मोठे आव्हान आहे. अशा प्रकारच्या कारमध्ये जे फेरबदल शक्य आहेत ते भारतीय ग्राहकांना रुचणार नाहीत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. वाघ कंपनीत प्रवासी वाहनांच्या योजना आणि संबंधित प्रकल्पांचे व्यवस्थापन पाहतात. ते म्हणाले की, आम्हाला संशोधनावर आणखी परिश्रम घेण्याची गरज आहे. सध्या डिझेलचे मूल्य ग्राहक आणि कार उत्पादक या दोघांच्याही विरुद्ध आहे. या कारचा इंधन खर्च कमी असेल; मात्र डिझेलमध्ये उच्च कोटीचे उत्सर्जन मापदंड पाळणे हे अधिक महाग आहे. त्यामुळे एका निश्चित दराहून कमी दरात डिझेल वाहन तयार करणे ग्राहक आणि कंपनी दोघांसाठी आर्थिकदृष्ट्या योग्य नाही, असेही ते म्हणाले. डिझेल नॅनो तूर्तास शक्य नसल्यामागच्या तांत्रिक अडचणींची यादी देताना ते म्हणाले की, डिझेल इंजिनचा आविष्कार करणे हे एक आव्हान आहे. आम्ही दोन सिलिंडरचे ८०० सीसी डिझेल इंजिन विकसित केले होते. ज्याचा उपयोग आमचे वाणिज्यिक वाहनधारक करतात. आम्ही या इंजिनचा आवाज, कंपन आणि कारमधील त्याच्या कामगिरीचा आढावा घेतला; मात्र आजच्या कार ग्राहकांना ज्या प्रकारचे संशोधन हवे आहे त्या कसोटीवर हे इंजिन उतरत नाही, असेही वाघ म्हणाले.
बहुचर्चित डिझेल नॅनो टाटाकडून थंड बस्त्यात
By admin | Updated: May 5, 2015 22:20 IST