Join us  

अंतरिम अर्थसंकल्पाचे स्वागत; वाढीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 6:58 AM

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विविध सवलतींच्या अंतरिम अर्थसंकल्पाचे बाजाराने प्रारंभी जोरदार स्वागत केले.

- प्रसाद गो. जोशी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विविध सवलतींच्या अंतरिम अर्थसंकल्पाचे बाजाराने प्रारंभी जोरदार स्वागत केले. मात्र, नंतर बाजाराचा जोश काहीसा थंड पडल्याचे दिसून आले. करदात्यांना मिळालेल्या सवलतींमुळे मध्यमवर्गीयांच्या हातामध्ये पैसा राहणार असून, त्यामधून क्रयशक्ती वाढून विविध आस्थापनांना @‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता असल्याने निवडक क्षेत्रांमध्ये तेजी दिसून आली.सप्ताहाच्या अखेरीस अंतरिम अर्थसंकल्प येणार असल्याने गतसप्ताहाच्या प्रारंभापासूनच बाजारात सावधपणे व्यवहार होत होते. त्यातच जानेवारी महिन्यातील आॅप्शनची सौदापूर्ती आणि परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री यामुळे बाजार आधी खाली आला. मात्र, लोकप्रिय घोषणा होण्याबाबत खात्री पटताच सप्ताहाच्या उत्तरार्धात त्यामध्ये वाढ झाली.मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने सप्ताहाचा प्रारंभ वाढीव पातळीवर (३६,०९९.६२) केला. त्यानंतर, हा निर्देशांक ३६,७७८.१४ ते ३५,३७५.५१ अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो मागील सप्ताहापेक्षा ४४३.८९ अंशांनी (१.२१ टक्के) वधारून ३६,४६९.४३ अंशांवर बंद झाला.राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ही सप्ताहात दोलायमान होता. सप्ताहाच्या अखेरीस व्यापक पायावरील हा निर्देशांक १.०३ टक्क्यांनी म्हणजेच ११३.१० अंशांनी वाढून १०,८९३.६५ अंशांवर बंद झाला. बाजाराच्या मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमधील घसरण काहीशी कमी झाली असली, तरी कायम आहे. सप्ताहाच्या अखेरीस मिडकॅप ४०.४४ अंशांनी घसरून १४,६४१.३८ अंशांवर बंद झाला. स्मॉलकॅप निर्देशांकाला १४ हजारांची पातळीही राखता आली नाही. तो १३,९५०.४५ अंशांवर बंद झाला. त्यामध्ये ४९.७५ अंश घट झाली.ग्राहकोपयोगी वस्तू, कृषी क्षेत्राशी संबंधित उद्योग आणि स्थावर मालमत्ताविषयक आस्थापनांचे समभाग तेजीत दिसून आले.परकीय वित्तसंस्थांचे पैसे काढून घेणे सुरूचभारतामधील आगामी निवडणुकांमुळे परकीय वित्तसंस्था, तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ‘थांबा आणि वाट बघा’ असे धोरण स्वीकारलेले दिसून येते. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात भारतीय भांडवल बाजारात गुंतवणूक केल्यानंतर, या संस्थांनी जानेवारी महिन्यात ५,३६१ कोटी रुपयांची विक्री करून ही रक्कम काढून घेतली आहे.आगामी निवडणुका आणि चालू सप्ताहात भारतीय रिझर्व्ह बॅँकेकडून पतधोरणाचा घेण्यात येणारा आढावा, यामुळे परकीय वित्तसंस्थांनी वाट बघण्याचे धोरण स्वीकारलेले दिसत आहे. या संस्थांनी जागतिक पातळीवरील अस्थिर धोरणामुळे गेले दोन महिने भारतात गुंतवणूक केली होती. मात्र, जानेवारी महिन्यामध्ये या संस्थांनी नफा कमविण्याची संधी मिळताच ही गुंतवणूक काढून घेतली आहे.अन्य काही लाभदायक पर्याय उपलब्ध न झाल्यास, या संस्था पुन्हा आपली गुंतवणूक आशियाई देशांकडे वळविण्याची शक्यता आहे.

टॅग्स :शेअर बाजारव्यवसाय