Join us

ऐन लग्नसराईत सोन्याचा भाव १८० रुपयांनी कोसळला

By admin | Updated: May 21, 2015 00:29 IST

विक्रेत्यांची मागणी घटल्याने बुधवारी सोन्याचा भाव १८० रुपयांनी कोसळून २७,६५० रुपये प्रति १० गॅ्रम झाला.

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील कमजोर संकेतांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफ्यात आभूषण निर्माते आणि किरकोळ विक्रेत्यांची मागणी घटल्याने बुधवारी सोन्याचा भाव १८० रुपयांनी कोसळून २७,६५० रुपये प्रति १० गॅ्रम झाला. औद्योगिक संस्था आणि नाणे निर्मात्यांकडून मागणी घटल्याने चांदीचा भावही ६०० रुपयांनी कमी होऊन ३९,१०० प्रतिकिलो राहिला. बाजार सूत्रांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याच्या भावात दोन आठवड्यांची सर्वांत मोठी घसरण नोंदली गेली. परिणामी स्थानिक बाजार धारणा नकारात्मक राहिली. अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या गेल्या बैठकीचा अहवाल जारी होण्यापूर्वी गृहनिर्माण बाजारातील सुधारणेच्या पार्श्वभूमीवर व्याजदरात वाढ होण्याच्या मुद्याला बळ मिळेल, अशी चर्चा होती. सध्याच्या पातळीवर आभूषण निर्माते आणि किरकोळ विक्रेत्यांची मागणी घटल्यानेही बाजार धारणेवर परिणाम झाला.जागतिक पातळीवर देशांतर्गत बाजाराचा कल निश्चित करणाऱ्या सिंगापूर येथे सोन्याचा भाव ०.२ टक्क्यांनी घटून १,२०५.४६ डॉलर प्रतिऔंस राहिला. दुसरीकडे चांदीचा भाव ०.७ टक्क्यांच्या घसरणीसह १६.९९ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाला. तयार चांदीचा भाव ६०० रुपयांनी कमी होऊन ३९,१०० रुपये किलो, तर साप्ताहिक डिलिव्हरीच्या चांदीचा भाव १,००५ रुपयांनी कोसळून ३८,९९0 रुपये किलो झाला. चांदीच्या शिक्क्यांचा भावही घसरून खरेदीसाठी ५८ हजार रुपये, तर विक्रीसाठी ५९,००० रुपये प्रतिशेकडा झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क) ४राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी १८० रुपयांनी घटून अनुक्रमे २७,६५० रुपये आणि २७,५०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भावही १०० रुपयांच्या घसरणीसह २३,८०० रुपयांवर आला.