Join us  

अर्थशेखरी - संपत्ती ही दुपारची सावली...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2019 10:55 PM

अनोखी शब्दकळा हे जसं समर्थ रामदासांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य आहे ;

चन्द्रशेखर टिळकअनोखी शब्दकळा हे जसं समर्थ रामदासांच्या लेखनशैलीचे वैशिष्ट्य आहे ; तसेच आणि तितकेच त्यांच्या लेखनशैलीचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे वेगळीच उपमा-उपमान शैली. आपला विषय मांडताना त्यांनी दिलेल्या उपमांना अद्भुतही म्हणता येत नाही . कारण त्या आपल्या दररोजच्या जगण्यात अनुभवास येणाऱ्या असतात. पण तरीही त्या अशा काही चपखलपणे बसतात ना की त्यामुळे विषय तर आपल्या डोक्यात बसतोच... पण त्याचवेळी असे दोन विषय एकत्र जोडता येतील हे आपल्या डोक्यात कधीच आले नव्हते हे जाणवत राहते. याबाबत संतश्रेष्ठ तुकाराम महाराज त्यांचे जुळे भाऊ !आता हेच बघा ना...

संपत्ती हा तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य संसारी - प्रापंचिक माणसाचा प्राणवायू आणि दुपारची सावली हाही नेहमीचा अनुभव. पण संपत्ती ही दुपारच्या सावलीसारखी आहे हे आपल्यापैकी कोणाच्याच डोक्यात आले नाही. पण समर्थ रामदास स्वामी सार्थ दासबोधाच्या १७ व्या दशकातल्या ७ व्या समासाच्या २८ व्या ओवीत छानपणे सांगून जातात...‘ऐशी हे सृष्टीची चाली ।संपत्ती दुपारची साऊली।वयेसा तरी निघून गेली।हळूहळू ।’आजही हा विचार, हा अनुभव दररोज येतोच की ! अगदी सगळ्यांना ! अशावेळी या समासाचे शीर्षक ‘जगज्जीवननिरूपण’ आहे हे अतिशय सूचक वाटायला लागते.सावली आपलीच.आपण तेच असतो. पण दिवसाच्या सकाळी असणारी सावली आपल्याच दुपारच्या सावलीपेक्षा वेगळी भासते. संध्याकाळी सगळे गणितच वेगळे असते. ‘संध्याछाया भिववती हृदया’ असं काहीसं...हे काय समर्थांना माहिती नसेल का ? तरीही संपत्तीचे वर्णन करताना उपमा मात्र दुपारच्या सावलीची देतात... दुपारची सावली ... आपल्याच पायात घुटमळणारी. दुपारची सावली... तिला बघायचे तर आपल्याच पायांकडे आपल्यालाच निरखून पाहायला लावणारी. दुपारची सावली... आपल्याला जेंव्हा खरी गरज असते तेंव्हा कधीच उपयोगी न पडणारी... युद्धाच्या ऐनवेळी मंत्र-तंत्र विसरलेल्या योद्ध्यासारखी... नाहीतर

युद्धाच्याबरोबर आधी कवचकुंडले काढून घेतल्यासारखी !हे वाचत असताना सहजच मनात आले की हे काही केवळ आर्थिक संपत्ती विषयीच खरे नाही ना ! आपले भावबंध तरी कुठे वेगळे वागतात ? नातेसंबंध तरी कुठे अपवाद असतात याला ? यात भावना कारण असतात की परिणाम ? तारक असतात की मारक ? असे प्रश्न मनात यायला लागतात आणि मग नेहमीच्या सवयीने असले मुद्दे मनोमन गुंतवणूक क्षेत्राला आपोआपच प्रश्न विचारायला सुरुवात करतात.त्यातच इथे तर संपत्ती दुपारची सावली असाच मुळी विषय ! बचत किंवा गुंतवणूक करताना तुमच्या - माझ्यासारखा माणूस पोटाला चिमटा घेऊन ती करत असतो. आपल्याला आर्थिक उन्हातही सावली देईल अशीच आशा मनोमन बाळगून आपण अशी गुंतवणूक करत असतो. पण प्रत्यक्षात जेंव्हा आयुष्याच्या वाटेवर अडचणीच्या उन्हाचे चटके बसायला लागतात तेंव्हा मात्र ही गुंतवणूक अनेकदा, अनेकांच्या बाबतीत उत्तर ठरण्यापेक्षाही अडचणीत आणणारी गोष्ट असल्यासारखे वाटायला लागते. जी गुंतवणूक करताना आपण जीवाचा आटापिटा केलेला असतो ती गुंतवणूक अशावेळी आपल्याशी अबाधुबी खेळायला लागते ....निदान आंधळी कोशिंबीर तरी नक्कीच !असं जेंव्हा मला माझ्या गुंतवणुकीविषयी वाटायला - जाणवायला लागते, तेंव्हा मला नेहमीच वाटते की इतक्या मर्यादीत अर्थाने समर्थ रामदास ‘संपत्ती दुपारची सावली’ म्हणत नसावेत असा विचार डोकावल्याशिवाय राहत नाही ! असं वाटायला लागते की अशी दुपार आपणच आपल्यावर ओढवून घेतलेली असते, असं तर समर्थांना सांगायचे नाही ना ? आपण गुंतवणूक करताना इतक्या एकारलेपणाने, इतक्या झापडबंद पद्धतीने, इतकं आंधळे होऊन करतो की त्यातून गरजेच्यावेळी तर सोडाच, पण इतरही वेळी कधीच फायदा होण्याची खरंच किती रास्त - वास्तव शक्यता आहे हेच आपण पाहिलेले नसते. मग दुसरे काय होणार ?अर्थकारणात ‘असेल हरी तर देईल खाटल्या वरी’ असा विचार करून चालत नाही. गुंतवणूक क्षेत्रात तर नाहीच नाही ! या क्षेत्राचा हरी असा भारी आहे की तुम्ही काळजी घेतली नाही तर काही देणे तर सोडाच, तुमचे खाटले ही तो घेऊन जाईल ! यात दोष त्या हरीचा नाही. आपण आंधळे, बहिरें होऊन गुंतवणूक करणार असू तर त्याचे परिणाम मूक होऊन स्वीकारण्यापलीकडे आपल्या हाती काय राहते?अशा अर्थाने ‘संपत्ती दुपारची सावली’!याबाबतची दुसरी अडचण अशी आहे की पहाटेची सकाळ आणि सकाळची दुपार जशी एकदम, अचानक होत नाही. ती हळूहळू होत जाते, पण दुपारचा सूर्य पार डोक्यावर आल्याखेरीज त्याची जाणीव होत नाही. अगदी तसंच आपल्या अर्थार्जनाच्या सवयींची सवय आहे. पण तोपर्यंत अनेकदा वेळ टळून गेलेली असते... अशा अर्थाने ‘वयेसा तरी निघून गेली...’ पण म्हणून संपत्तीचे महत्त्व संपत नाही आणि हेच सांगायला समर्थ रामदास विसरत नाहीत!(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत.)आपली सावली आपली कधी पाठ सोडत नाही म्हणतात हे खरं आहे. पण ती सावली प्रत्येक वेळी वेगवेगळी भासते. सकाळची वेगळी, दुपारची वेगळी असते. दुपारची सावली तर आपल्याच पायात घुटमळते. तिला बघायचे तर आपल्याच पायांकडे आपल्यालाच निरखून पाहायला लागते. बचत किंवा गुंतवणूक करताना सर्वसामान्य माणूस पोटाला चिमटे काढतो. आर्थिक उन्हात हीच संपत्ती सावली देईल या अपेक्षेने गुंतवणूक करतो. पण अनेकजण आंधळे होऊन, बहिरे होऊन गुंतवणूक करतात. गरजेच्या वेळी तर सोडाच पण, त्या गुंतवणुकीचा पुरेसा फायदा होण्याची खरंच किती वास्तव शक्यता आहे हे आपण पाहिलेलेच नसते आणि मग अडचणीच्या वेळी संपत्ती असूनही आर्थिक उन्हाचे चटके बसू लागतात, हेच खरे. 

टॅग्स :अर्थव्यवस्थारुपी बँक