Join us  

लॉकडाऊनमध्ये अब्जाधीशांची संपत्ती वाढली; भारतातील अतिश्रीमंत व्यक्तींच्या मालमत्तेत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 5:55 AM

भारतातील अब्जाधीशांची संपत्ती या काळात ३५ टक्क्यांनी वाढून ४२२.९ अब्ज डॉलर झाली.

नवी दिल्ली : कोविड १९च्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे भारतातील गोरगरीब लोकांना खायला मिळण्याची मारामार असताना, देशातील अब्जाधीशांची संपत्ती मात्र ३५ टक्क्यांनी वाढल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. 

दावोस येथे होत असलेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या शुभारंभदिनी ‘ऑक्सफॅम’ या संस्थेने जारी केलेल्या ‘विषमता विषाणू अहवाल’ या दस्तावेजात ही माहिती देण्यात आली आहे. अहवालात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात भारतातील २४ टक्के लाेकांचे मासिक उत्पन्न अवघे ३ हजार रुपये होते. भारत आणि आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी यांचे दर तासाचे उत्पन्न मात्र ९० कोटी रुपये होते.

भारतातील अब्जाधीशांची संपत्ती या काळात ३५ टक्क्यांनी वाढून ४२२.९ अब्ज डॉलर झाली. भारतातील अब्जाधीशांच्या संपत्तीतील वाढ अमेरिका, चीन, जर्मनी, रशिया आणि फ्रान्स यांच्यानंतर सहाव्या स्थानी राहिली. अहवालात म्हटले आहे की, लॉकडाऊन काळात भारतातील १०० अब्जाधीशांची संपत्ती इतकी वाढली की, देशातील १३८ दशलक्ष गरिबांना प्रत्येकी ९४,०४५ रुपये ते देऊ शकले असते. केवळ ११ अब्जाधीशांकडे साथीच्या काळात जी संपत्ती वाढली, त्यातून मनरेगा किंवा भारत सरकारच्या आरोग्य खात्याचा पुढील १० वर्षांचा खर्च करता येऊ शकेल.