उल्हासनगर महासभेत पाण्यावरून हंगामा
By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST
उल्हासनगर : एमआयडीसीकडून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असून संतप्त नगरसेवकांनी शुक्रवारी महासभेत एकच गोंधळ घातला. ठेकेदारावर कारवाई होत नसल्यास शहराचे नामांतर कोणार्क करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
उल्हासनगर महासभेत पाण्यावरून हंगामा
उल्हासनगर : एमआयडीसीकडून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाली असून संतप्त नगरसेवकांनी शुक्रवारी महासभेत एकच गोंधळ घातला. ठेकेदारावर कारवाई होत नसल्यास शहराचे नामांतर कोणार्क करण्याची मागणी त्यांनी केली आहे. उल्हासनगरात बारमाही वाहणारी उल्हास नदी असून स्वत:ची पाणीपुरवठा योजना पालिकेकडे नसल्याने पाण्यासाठी एमआयडीसीवर अवलंबून राहावे लागते. मात्र, एमआयडीसी आठवड्यातून दर शुक्रवारी २४ तास पाणीपुरवठा बंद ठेवत असून त्याचा परिणाम गुरुवार ते शनिवारच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे. सलग तीन दिवस पाणी कमी दाबाने येत असल्याने शहरात पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राजू जग्यासी यांनी केला आहे. बीएसपीच्या नगरसेविका शैलजा सोनताटे, सेनेच्या समिधा कोरडे, काँग्रेसच्या अंजली साळवे, मीना सोडे आदींनी पाण्याचा प्रश्न लावून धरल्याने महासभेतील वातावरण तणावपूर्ण झाले होते. शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी २७८ कोटींची पाणीपुरवठा वितरण योजना राबविण्यात येत आहे. योजनेचे काम संथगतीने सुरू असून पाणीटंचाईस योजनेचा ठेकेदार कोणार्क जबाबदार असल्याची टीका होत आहे. अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी बहुतांश नगरसेवकांनी आयुक्तांकडे केली आहे. कारवाई होत नसल्यास उल्हासनगरचे नामांतर कोणार्क करण्याची संतप्त सूचना नगरसेवक सुनील सुर्वे, राजेश वानखडे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी महासभेत केली आहे. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी एमआयडीसीकडून कमी व अनियमित पाणीपुरवठा होत असल्याची माहिती देऊन याबाबत नगरसेवकांनी राजकीय हस्तक्षेप करण्याची सूचना केली़ तसेच महापालिकेची पाणीपुरवठा योजना डिसेंबरअखेर पूर्ण होणार असल्याचे सांगितले़....................वाचली - नारायण जाधव