तीन गावांत पाण्यातून विषबाधा?
By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST
बदलापूर जवळची गावे : अधिकारी म्हणतात मासे खाल्ल्याने झाला त्रास
तीन गावांत पाण्यातून विषबाधा?
बदलापूर जवळची गावे : अधिकारी म्हणतात मासे खाल्ल्याने झाला त्रास............अंबरनाथ - बदलापूर शहराला लागून असलेल्या ढोके, दापिवली आणि आंबेशीव या गावांतील नागरिकांना शुक्रवारी सायंकाळी अचानक उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. पाण्यातून विषबाधा झाल्याचा गोंगाट झाल्याने नागरिकांची रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, प्रत्यक्षात कोणताही गंभीर प्रकार नसून त्रास झालेल्या नागरिकांना उपचार करून सोडून देण्यात आले. ग्रामस्थांच्या मते पाण्यातून विषबाधा झाली तर अधिकारी म्हणतात की, पाण्याचे नमुने योग्य असून ग्रामस्थांनी मासे खाल्ल्याने त्रास झाल्याची शक्यता आहे. परंतु, सूत्रांच्या म्हणण्यानुसार ढोके, दापिवली आणि आंबेशीव या तीन गावांसाठी एकच पाणीपुरवठा योजना आहे. या पाण्याच्या टाकीचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरण्यात येणार्या पीसीएल या रासायनिक द्रव्याचे प्रमाण वाढल्याने त्या पाण्याचा त्रास नागरिकांना झाला. एकाच वेळी ३० ते ३५ नागरिकांना त्रास जाणवल्याने तिन्ही गावांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विषबाधा झाल्याचा गोंगाट संपूर्ण गावात झाल्याने ग्रामस्थ आणि त्रास झालेले रुग्ण भयभीत झाले. ज्यांना त्रास होत होता, त्यांना लागलीच रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करून शनिवारी घरी सोडण्यात आले. ...कारणाविषयी संदिग्धतानागरिकांना हा त्रास कशामुळे झाला, याचे ठोस कारण अजून अधिकार्यांना सापडले नाही. काही ग्रामस्थांच्या मते विहिरीत मासे मारण्यासाठी कोणीतरी औषध टाकल्याने हा त्रास झाला. काहींच्या मते पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणार्या औषधाचे प्रमाण जास्त झाल्याने नागरिकांना ही विषबाधा झाली. मात्र, या घटनेनंतर शासकीय यंत्रणेने घेतलेल्या आढाव्यानुसार प्रथमदर्शनी पाण्याचे नमुने योग्य आढळले आहेत. तरीही, पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. यासंदर्भात गटविकास अधिकार्यांना विचारले असता त्यांच्या मते नागरिकांना दूषित पाण्यातील मासे खाल्ल्याने त्रास झाल्याची शक्यता वाटत असल्याचे स्पष्ट केले. या सर्व प्रकाराबाबत तहसीलदार अमित सानप यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, नागरिकांना त्रास झाल्यावर त्यांच्यावर लागलीच रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले. काही रुग्णांना २४ तासांनंतर सोडण्यात आले. हा प्रकार कशामुळे घडला, याची चाचपणी करण्यासाठी पाण्याने नमुने घेण्यात आले आहेत. लोकांच्या मदतीसाठी केंद्र उभारण्यात आले असून त्यांना योग्य प्रमाणात औषधपुरवठा केला जात आहे. (प्रतिनिधी)