Join us  

नव्या वर्षात गुंतवणूक करायचीय... मग या चुका अजिबात करू नका !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 10:16 PM

गेल्या वर्षात जीडीपीमध्ये घसरण झाली होती. त्यामुळे शेअर बाजारावरही त्याचा नकारात्मक प्रभाव पडत होता.

मुंबईः 2019 हे वर्षं अर्थव्यवस्थेसाठी फार काही आशादायी नव्हते. गेल्या वर्षात जीडीपीमध्ये घसरण झाली होती. त्यामुळे शेअर बाजारावरही त्याचा नकारात्मक प्रभाव पडत होता. अनेक कंपन्यांचे लाखोंचे शेअर्स कवडीमोल भावापर्यंत आले होते. त्यामुळे म्युच्युअल फंड, पोस्टात किंवा बँकेत पैसे गुंतवताना काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून आपले पैसे कुठेही बुडणार नाहीत किंवा आपल्याला तोटा सहन करावा लागणार नाही.  

कोणत्याही योजनेत गुंतवणूक करताना दृष्टिकोन ही महत्त्वाची बाब असते. बाजारात गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी वेळेचं भान पाळलं पाहिजे. म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणं हा सुरक्षित पर्याय समजला जातो. परंतु म्युच्युअल फंडही शेअर बाजारावर अवलंबून असतो.   

  • घाईघाईत निर्णय घेणं पडू शकतं महागात

शेअर बाजारात कधी उत्साह असतो, तर कधी निर्देशांक नीचांकावर जातो. त्यामुळे गुंतवणूकदारांना बाजारात गुंतवलेल्या पैशांची काळजी सतावत असते. शेअर बाजार घसरत असताना गुंतवणूकदारांनी सतर्कता बाळगणे गरजेचं असतं. शेअर लागलीच विकून न टाकता काही काळ वाट पाहावी. त्यामुळे तुम्ही गुंतवलेल्या पैशातील शेअर्समध्ये तेजी येऊ शकते.   

  • मागच्या अनुभवांतून शिकण्याची गरज

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना मागचा अनुभव लक्षात घेण्याची गरज आहे. परंतु काही वाईट अनुभवामुळे घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. फंड नियोजनात मागचा रेकॉर्ड आणि फंड व्यवस्थापकाचे व्यावहारिक कौशल्य, त्या कंपनीच्या कामगिरीचं अवलोकन करून निर्णय घेणं फायद्याचं असतं. 

  • निश्चित उत्पन्नात ठरावीक गुंतवणूक करा

निश्चित उत्पन्नात गुंतवणूक करताना काळजी घेण्याची गरज आहे. गुंतवणुकीसाठी कमी जोखमीचे आणि सुरक्षित पर्याय निवडावे. वाढत्या महागाईने निश्चित उत्पन्नात केलेली गुंतवणुकीची जोखीम वाढू शकते. त्यामुळे अर्थतज्ज्ञांकडून सल्ला घेऊनच वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांत गुंतवणूक करा. 

  • विमा म्हणजे गुंतवणूक नव्हे

विमा काढणे म्हणजे तुम्ही गुंतवणूक केल्याचा समज करून घेऊ नका. विमा आणि गुंतवणूक या दोन्ही परस्पर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही गोष्टींना एकत्र करण्याची चूक करू नका. विमा आणि गुंतवणूक या दोघांची उद्दिष्ट वेगवेगळी आहेत. 

  • कर बचतीसाठी अखेरच्या वेळी घाईगडबड नको

गुंतवणूक करताना कर बचतीची चिंता अनेकांना सतावते. त्यामुळे हिशेब करूनच कर बचतीच्या गुंतवणुकीचा विचार करा. आणीबाणीच्या प्रसंगी तुम्हाला तातडीने पैशांची गरज भासल्यास ती पूर्ण होण्याइतका निधी स्वतःजवळ ठेवला पाहिजे. अर्थतज्ज्ञांच्या मते 3 ते 6 महिन्यांचा घरखर्च निघेल एवढी रक्कम राखून ठेवणं आवश्यक आहे. 

टॅग्स :सरकारी योजनागुंतवणूक