विदर्भातील मासेमार मदतीच्या प्रतिक्षेत
By admin | Updated: September 1, 2014 21:34 IST
विदर्भातील मासेमार मदतीच्या प्रतिक्षेत
नैसर्गिक आपत्ती : ११ कोटींच्या निधीचे काय झाले ? दिलीप दहेलकरगडचिरोली : विदर्भात मागील वर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन तलावातील मासे तसेच मत्स्यबीज वाहून गेले. नैसर्गिक आपत्तीचा हजारो मासेमारांना फटका बसला. आपत्तीग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाने विदर्भासाठी ११ कोटी ७० लाख रूपयांची मदत जाहीर केली. मात्र जाचक नियमावलीमुळी जिल्ह्यातील मत्स्य संस्थांचे ७४ प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत.विदर्भातील इतर जिल्ह्यांतील स्थितीही वेगळी नसून शेकडो प्रस्ताव मंजूर झालेले नाहीत. मागील वर्षीच्या पावसाने गेल्या २० वर्षांतील सरासरी मोडली. काही ठिकाणी तर अतिवृष्टी झाली. नैसर्गिक आपत्तीत शेकडो घरांची पडझड झाली. हजारो हेक्टरवरील पीक वाहून गेले. शासनाने शेतकरी व आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदत दिली. मात्र विदर्भातील मासेमार अद्यापही मदतीच्या प्रतिक्षेतच आहेत. गतवर्षीच्या अतिवृष्टीमुळे मत्स्य संस्था आर्थिक संकटात सापडल्या. सरकारी सर्वेक्षणानुसार गडचिरोली जिल्ह्यात मासेमारांचे ८८ लाख ६३ हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले होते. नुकसानग्रस्त मासेमार तसेच मत्स्य संस्थांना आर्थिक मदत जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. १३ फेबु्रवारी २०१४ रोजी नवा शासन निर्णय जारी करून जिल्हा मत्स्य अधिकार्यांमार्फत नुकसानग्रस्त तलावांचे सर्वेक्षण करण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोलीच्या जिल्हा मत्स्य अधिकार्यांनी मत्स्य संस्थांकडून अर्ज मागविले. त्यांची छाननी करून जिल्ह्यातील ७४ प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आले. १३ फेब्रुवारी २०१४ च्या शासन निर्णयानुसार विदर्भातील सहा जिल्ह्यासाठी ११ कोटी ७० लाखांची आर्थिक मदत जाहीर झाली. मात्र नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा जिल्ह्यांसाठी जाहीर झालेल्या मदतीचे अजून संपूर्णपणे वाटप झालेले नाही.