Join us

राजापुरात वाळू माफियांकडून ग्रामस्थांवर हल्ला

By admin | Updated: November 22, 2014 23:30 IST

राजापुरात वाळू माफियांकडून ग्रामस्थांवर हल्ला

राजापुरात वाळू माफियांकडून ग्रामस्थांवर हल्ला
सहाजण जखमी : वाळू उपशाला विरोध केल्यामुळे कृत्य; तलवार, कुर्‍हाड, चॉपरचा वापर
तासगाव (जि़ सांगली) : तालुक्यातील येरळा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपशाला विरोध करणार्‍या ग्रामस्थांवर वाळू माफियांनी हल्ला केला. यामध्ये सहाजण जखमी झाले. शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. घटनेनंतर माफियांनी ट्रॅक्टरसह पलायन केले. जखमींवर तासगाव व सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. लोखंडी गज, खोर्‍याने ग्रामस्थांना मारहाण करण्यात आली. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
जखमींमध्ये संजय रंगराव पाटील, महादेव खाशाबा पाटील, पोपट ज्ञानदेव हजारे, विजय हणमंत पाटील, वसंत राजाराम पवार व दाजी पंडित पाटील यांचा समावेश आहे. याप्रकरणी तासगाव पोलिसात दिनकर पाटील, पोपट पाटील, जमीर शेख, अण्णासाहेब यलमार, दादासाहेब विश्वनाथ पाटील यांच्यासह ३० ते ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुमारे एक वर्षापूर्वी गावात येरळा बचाव समिती स्थापन करण्यात आली आहे. शुक्रवारी शिरगावमधील वाळू चोरटे ट्रॅक्टर घेऊन नदीपात्रात येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे ग्रामस्थांनी गावातील तलाठी धस यांना बोलावून घेतले होते. त्यांच्यासह समितीमधील सदस्य बॅटरी घेऊन रात्री ११ च्या सुमारास नदीपात्रात पाळत ठेवून होते. मध्यरात्रीनंतर साडेबाराच्या दरम्यान ७ ते ८ ट्रॅक्टर नदी पात्रात राजापूर हद्दीत आले.
पाळत ठेवून बसलेले ग्रामस्थ त्या ट्रॅक्टरजवळ गेले. त्यांना थांबवून वाळू भरू नका, असे सांगितले. तलाठी धस यांनी ट्रॅक्टर तहसील कार्यालयाकडे घेऊन चला, असे सांगितले. त्यावेळी पाच संशयित व त्यांचे ३० ते ४० साथीदार अंगावर धावून आले. तुम्ही वाळू थांबविणारे कोण, असे म्हणत त्यांनी हातातील खोरे, नदीपात्रातील दगड घेऊन मारहाणीस सुरुवात केली. त्यात संजय पाटील, महादेव पाटील, पोपट हजारे, विजय पाटील, वसंत पवार व दाजी पाटील जखमी झाले. हल्लेखोरांना विरोध करीत असतानाच संजय पाटील यांच्या डोक्यात खोर्‍याचा घाव बसल्याने ते जखमी होऊन खाली पडल्यानंतर मारहाण करणारे ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पळून गेले. ग्रामस्थांनी संजय पाटील यांना प्रथम तासगाव व नंतर सांगली येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर रात्रीच ते सांगलीत पोलीस अधीक्षकांना भेटले. घटनेची माहिती देऊन शनिवारी सकाळी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. (वार्ताहर)
चौकट
हल्लेखोर फरार!
घटनेनंतर वाळू चोरांनी ट्रॅक्टरसह पलायन केले. पोलिसांनी शिरगाव परिसरात शोध घेतला. तरीही ते सापडले नाहीत. आरोपींना लवकरच अटक करण्यासाठी पोलिसांची पथके शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक रमेश बनकर यांनी सांगितले.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
ट्रॅक्टर्सना नंबर नाहीत
वाळू चोरीसाठी वापरण्यात येणार्‍या ट्रॅक्टर्संना नंबर नसतो. त्यामुळे ट्रॅक्टर ओळखणे अवघड होते. एकूणच वाळू माफियांबाबत प्रशासनाला कठोर भूमिका घ्यावी लागणार आहे.