Join us

विदर्भातील कापूस प्रक्रिया उद्योगाला आली अवकळा

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

कॉटन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भातील कापूस प्रक्रिया उद्योगावर अवकळा आली आहे. यंदाही कापसाचे भाव वाढण्याची चिन्हे नसल्याने

यवतमाळ : कॉटन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विदर्भातील कापूस प्रक्रिया उद्योगावर अवकळा आली आहे. यंदाही कापसाचे भाव वाढण्याची चिन्हे नसल्याने ही अवस्था किमान पुढील वर्षभर तरी कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. यवतमाळच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील कापूस उद्योग देशोधाडीला लागतो आहे. शासनाने कापूस प्रक्रिया उद्योगांना सोई सवलती, संरक्षण न देणे, कापसाला लागवड खर्चाच्या तुलनेत भाव न देण्याचा हा परिणाम मानला जात आहे. आजच्या घडीला कापसाचा लागवड खर्च दरवर्षी ३० टक्क्यांनी वाढतो आहे. हेक्टरी खर्च ४० हजार आणि उत्पन्न अवघे १६ ते १७ हजार अशी विसंगत स्थिती निर्माण झाली आहे. कधी काळी कॅश-क्रॉप म्हणून ओळखला जाणारा कापूस आज तोट्याचे पीक ठरला आहे.या कापसावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यावर रोजगार व गावागावातील बाजार चालतात. मात्र आज या बाजारात मंदी पहायला मिळते. पाच वर्षांपूर्वी कापसाचे भाव सहा ते सात हजारांवर गेल्याने आशादायी चित्र निर्माण झाले होते. त्यातूनच ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्ज काढून जिनिंग-प्रेसिंग व्यवसाय थाटले गेले. परंतु आता कापसाचा हमी भाव चार हजारापुढे सरकत नसल्याने कापसाचे लागवड क्षेत्र दरवर्षी कमी होत आहे. कापूसच पुरेसा नसल्याने जिनिंग-प्रेसिंग बंद पडत आहेत. सहकारातील काही जिनिंग तर पाठोपाठ विकल्या गेल्या आहेत. आता खासगी व्यापारीही त्याच वाटेवर आहेत. जिनिंग-प्रेसिंग बंद होत असल्याने तेथे राबणाऱ्या शेकडो मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.हेक्टरी दहा ते बारा हजार रुपये नुकसान होत असल्याने कापूस लागवडीकडील कल कमी होत आहे. त्याची जागा सोयाबीनने घेतली. परंतु गेल्या वर्षी सोयाबीन पिकलाच नाही. सोयाबीनच्या शेतात गुरे-ढोरे सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. गेल्या वर्षी सोयाबीनने दगा दिल्याने यंदा काही प्रमाणात कापसाचे क्षेत्र वाढले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)