अकोला : सततचे ढगाळ वातावरण किडींना पोषक ठरत आहे. परिणामी, हरभरा पिकावर घाटेअळीचा जोर पुन्हा वाढला आहे, तर यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांनी अल्पक्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी केली आहे. त्यातच किडींचा प्रादुर्भाव सतत वाढत असल्याने शेतकरी त्रस्त झालाआहे.गत आठवड्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पीक संरक्षण विभागाच्या तज्ज्ञ चमूने वऱ्हाडातील पाच जिल्ह्यांचे रबी पिकांचे सर्वेक्षण केले होते. त्यावेळी हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाल्याने निदर्शनास आले होते. आता या अळीचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी खरिपात कोरडे ठेवलेल्या शेतावर शेतकऱ्यांनी हरभरा पेरणी लवकर केली आहे. तेथील हरभरा आता ३० ते ४० दिवसांचा होत आला आहे. अशा भागात अळीचा प्रादुर्भाव अधिक आहे.शेतात सध्या हिरवी पिके कमी असल्याने कापसावर वास्तव्य करणाऱ्या हिरव्या बोंडअळीनेसुद्धा रबी पिकाकडे आपला मोर्चा वळवला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी हरभरा उगवला नसून, झाडांची उंची खुंटली आहे. या झाडांची उंची वाढावी व चांगले उत्पादन मिळावे, याकरिता शेतकरी कीटकनाशकासोबतच पिकावर टॉनिक रसायनाचा प्रयोग करीत आहेत.> शेताचे दररोज निरीक्षण करा या किडीचा प्रादुर्भाव बघता शेतकऱ्यांनी शेताचे दररोज निरीक्षण, सर्वेक्षण करावे व कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार विविध कीटनाशकांची फवारणी करावी. -डॉ. धनराज उंदीरवाडे, विभागप्रमुख,कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
विदर्भात हरभऱ्यावर घाटे अळीचा जोर वाढला!
By admin | Updated: December 10, 2015 23:28 IST