Join us

विदर्भात जमिनीला पडल्या प्रचंड भेगा

By admin | Updated: September 29, 2014 06:11 IST

यंदा विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, खरीप पिकांना अगोदरच झळ बसली आहे. आता जमिनीला प्रचंड भेगा

अकोला : यंदा विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, खरीप पिकांना अगोदरच झळ बसली आहे. आता जमिनीला प्रचंड भेगा पडल्याने परिपक्वतेच्या अवस्थेत असलेल्या खरीप पिकांसमोल नवे संकट उभे ठाकले आहे.यंदा दोन महिने विलंबाने पावसाळ्याला सुरुवात झाली. जून महिन्यात येणारा पाऊस जुलै महिन्याच्या शेवटी आला. पावसाचे प्रमाण विदर्भात एकसारखे नव्हते. पूर्व विदर्भात दमदार कोसळला, तर पश्चिम विदर्भात तेवढा जोर नव्हता. त्यामुळे पेरण्यांची वेळ निघून गेली. दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी आॅगस्टच्या पंधरवड्यानंतरही पेरणी केली. या पेरणीला अडिच महिने विलंब झाला. उशिरा पेरणीमुळे उत्पादनात फरक पडेलच, असे माहीत असूनही शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बियाणे पेरणेच पसंत केले. या परिस्थितीत पश्चिम विदर्भातील २० टक्के शेतकऱ्यांनी तिफण थांबविली. म्हणजेच खरीप हंगामातील २० टक्के क्षेत्रावरील पेरण्या यंदा झाल्याच नाहीत. शेतकऱ्यांनी सर्वाधिक सोयाबीन, कापूस या वाणांची पेरणी केली आहे. विदर्भात जवळपास १८ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरण्यात आले आहे, तर कापूस पट्टा असलेल्या पश्चिम विदर्भात १० लाख हेक्टर क्षेत्रावर कपाशीची पेरणी करण्यात आली आहे. आता ही सर्व पीकं परिपक्वतेच्या अवस्थेत आहे; पण या भागात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जमिनीला प्रचंड भेगा पडल्या असून, उष्णतामानात प्रचंड वाढ झाल्याने जमिनीतील ओलावाही कमी झाला आहे. त्यामुळे शेतजमीन कडक झाली असून, बऱ्याच भागातील जमीन फाकली आहे. त्याचा फटका खरीप पिकांना बसताना दिसतो आहे. जमीन फाकल्यामुळे पिकांच्या मुळापर्यंत तापमान व हवा पोहोचत असल्याने पिके वाळण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी परतीच्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे. परतीचा पाऊस आला तरच खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे.