Join us  

Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 8:29 AM

Vicco Chairman Yashwant Pendharkar : आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधनं तयार करणारी कंपनी विको लॅबोरेटरीजचे अध्यक्ष यशवंत पेंढारकर (Yeshwant Pendharkar) यांचं शुक्रवारी सायंकाळी निधन झालं.

Vicco Chairman Yashwant Pendharkar : आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधनं तयार करणारी कंपनी विको (Vicco) लॅबोरेटरीजचे अध्यक्ष यशवंत पेंढारकर (Yeshwant Pendharkar) यांचं शुक्रवारी सायंकाळी निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. यशवंत पेंढारकर हे २०१६ मध्ये विको कंपनीचे चेअरमन झाले. दूरदर्शनवरील 'विको टर्मरिक, नो कॉस्मेटिक, वेको टर्मेरिक आयुर्वेदिक क्रीम' आणि 'वज्रदंती, वज्रदंती विको वज्रदंती' यांसारख्या जिंगल्स आजही लोकांच्या स्मरणात आहेत. ८० च्या दशकात टीव्ही जिंगल्सनं संपूर्ण देशातील लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होतं. आज विको ही कंपनी अतिशय लोकप्रिय आहे. एकेकाळी त्यांची उत्पादनं घरोघरी जाऊन विकावी लागत होती. सुरुवातीला विकोची उत्पादनं एका किचनमध्ये तयार केली जात असत. 

विकोचं पूर्ण नाव विष्णू इंडस्ट्रियल केमिकल कंपनी आहे. १९५२ साली एका छोट्याशा घरात विको कंपनीची सुरुवात झाली. पहिले आयुर्वेदिक उत्पादन 'विको वज्रदंती टूथ पावडर' तयार करण्यात आले. हे उत्पादन १८ औषधी वनस्पतींपासून बनलेलं असल्याचा दावा करण्यात येत आहे. आपलं हे उत्पादन त्यांना घरोघरी जाऊन विकावं लागलं. त्यांच्या मेहनतीला लवकरच मोठं यश मिळालं आणि कंपनी सुरू केल्यानंतर तीन वर्षांतच कंपनीनं यशाचं शिखर गाठलं. १९५५ पर्यंत कंपनीची उलाढाल वार्षिक १० लाख रुपये झाली होती. परळमधील एका छोट्याशा गोदामात सुरू झालेल्या या कंपनीचं लवकरच मोठ्या कारखान्यात रूपांतर झाले. 

केशव विष्णू पेंढारकर यांनी ही कंपनी सुरू केली. नागपुरातील एका छोट्याशा वस्तीत ते रेशनचे छोटेदुकान चालवत होते. केशव यांनी काहीतरी नवीन करण्याचा विचार केला आणि कुटुंबासह मुंबई गाठली. लोक अॅलोपॅथिक औषधं तसंच अनेक परदेशी कॉस्मेटिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. यावरूनच त्यांना विको सुरू करण्याची कल्पना सुचली होती.

 

टॅग्स :व्यवसाय