मुंबई : अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ढेपाळणारा भारतीय रुपया आणि कच्च्या मालाच्या किमतीत होणारी वाढ या पार्श्वभूमीवर जानेवारी २०१६ पासून वाहनांच्या किमती महागणार आहेत. या किंमतवाढीमुळे वाहन खरेदीस इच्छुक अशा ग्राहकांच्या स्वप्नाला तर फटका बसणार आहेच पण, मंदीच्या फेऱ्यातून नुकत्याच सावरलेल्या वाहन उद्योगालाही पुन्हा ब्रेक बसण्याची शक्यताआहे. देशामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वाहन निर्मितीचे प्रकल्प असले तरी अनेक सुटे भाग आयात केले जातात. आयातीचे हे सर्व व्यवहार हे अमेरिकी डॉलरमध्ये होतात. परंतु, सध्या अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या किमतीने ६८ रुपयांचा उंबरठा गाठला आहे. परिणामी, या किमती वाढल्या आहेत. याचा थेट परिणाम उत्पादनाची किंमत वाढण्यात झाला असल्यामुळे या कंपन्यांनी किंमत वाढीचा निर्णय घेतला आहे.उपलब्ध माहितीनुसार या सर्व वाहनांच्या किमतीमध्ये एक टक्का ते ५ टक्के वाढ होऊ शकते. मारुती, ह्युंदाई, होन्डा, टोयोटा, टाटा मोटर्स, रेनॉ, निसान, आॅडी अशा सर्वच कंपन्यांनी दरवाढ करण्याचे संकेत दिले आहेत. मंदीच्या एका प्रदीर्घ फेऱ्यानंतर, २०१५ मध्ये अर्थव्यवस्थेत सुधार दिसून आला आणि त्यातच उद्योगाला गती देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षभरात सव्वा टक्के व्याजदर कपात केल्याने वाहन विक्रीचा आकडा दुप्पट झाला. मात्र, आता किमती वाढणार असल्यामुळे पुन्हा वाहन विक्रीला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ९० हजार गाड्या होन्डा माघारी बोलावणारइंधनाच्या पाईपमधील संभाव्य त्रुटीच्या पार्श्वभूमीवर होन्डा कंपनीने देशभरातील सुमारे ९० हजार वाहने माघारी बोलावली आहेत. डिझेल इंजिनाधारित ही मॉडेल्स असून यामध्ये होन्डा सिटी आणि मोबिलीओ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. जुलै २०१४ ते जुले २०१५ या कालावधीतील ही वाहने आहेत.जून्या स्टॉकवर सूट ?जानेवारीपासून किमती वाढणार असल्याने सध्या असलेल्या गाड्यांच्या विक्रीचा जोर वाढविण्यासाठी येत्या काही दिवसांत वाहन कंपन्यांतर्फे आणखी आकर्षक योजनांची घोषणा केली जाईल. साधारणपणे डिसेंबरमध्ये नव्या वाहनांची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल असतो. त्यामुळे वाहन कंपन्या आकर्षक सूट योजना जाहीर करत असतात. त्यामुळे यंदा डिसेंबर महिन्यात आणखी आकर्षक किमतीने वाहन विक्री होण्याची शक्यता आहे.
जानेवारीपासून वाहने महागणार
By admin | Updated: December 10, 2015 23:41 IST