Join us  

मंदीच्या फेऱ्यात अडकलेल्या वाहन क्षेत्राला सणासुदीत मिळाली उभारी; कार खरेदी वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 1:08 AM

दसरा-दिवाळीमुळे वाहन उद्योगाला समाधान

नवी दिल्ली : मंदीच्या लाटेमुळे गेले अनेक महिने चिंतेत असलेल्या वाहन उद्योगाला यंदाच्या दसरा व दिवाळीने आनंद दिला आहे. यावर्षी दसरा व दिवाळी या दोन सणाला वाहनांची अपेक्षेपणे अधिक खरेदी झाली. दिवाळीत तर मर्सिडिज बेंझच्या ६00 कार्स विकल्या गेल्या, ज्यांची किंमत ३0 लाख रुपयांहून अधिक असते.

मारुती-सुझुकी व ह्युंदाई यांच्या कार्सची दसरा व दिवाळीला चांगली विक्री झाल्याचे सांगण्यात आले. मारुती कारच्या विक्रीत गेल्या दसरा-दिवाळीच्या तुलनेत यंदा ७ टक्के, तर ह्युंदाई कारच्या विक्रीमध्ये १0 टक्के वाढ झाली. नवरात्री ते दसरा या १0 दिवसांत देशात मारुतीच्या तब्बल ६0 हजार कार्स विकल्या गेल्या, तर धनत्रयोदशीच्या एका दिवसांत ग्राहकांनी याच कंपनीच्या ४५ हजारहून अधिक कार्स विकत घेतल्या. ह्युंदाईच्या १४ हजार कार धनत्रयोदशीच्या दिवशी विकल्या गेल्या आणि दसरा आणि त्याआधीच्या नवरात्रीच्या काळात या कंपनीच्या ११ हजारांहून अधिक कार्सची विक्री झाली.

धनत्रयोदशीचा दिवस महिंद्रा कंपनीसाठीही चांगला ठरला. महिंद्राच्या १३,५00 कार्स एका दिवशी ग्राहकांनी खरेदी केल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत या तिन्ही कंपन्यांना यंदाचे सण पावले, असेच म्हणता येईल. किया मोटर्स व एमजी मोटर्स यांच्याही दिवाळीत प्रत्येकी तीन हजारांच्या आसपास कार विकल्या गेल्या. याखेरीज मर्सिडिज बेंझ कंपनीच्या ६00 कार्स एका दिवसात विकल्या गेल्या. त्यापैकी ३00 कार्स केवळ दिल्ली परिसरात विक्री झाल्या आहेत.३० हजार किलो सोने विकलेयंदा धनत्रयोदशीला ३0 हजार किलो सोन्याची विक्री झाली, याचा आम्हाला अंदाज आहे, असे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे सचिव सुरेंद्र मेहता म्हणाले. गेल्या वर्षी ४0 टन सोनेखरेदी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत सोने महागले, तरीही यंदा उत्साह घटला नाही.

टॅग्स :कार