Join us
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात कांदा उत्पादनावर भर! चाळी बांधण्याकडे लक्ष

By admin | Updated: August 13, 2015 22:03 IST

पश्चिम विदर्भात खरीप कांदा उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, याचे उत्पादन चांगले होत असल्याने अकोला जिल्ह्यात खरीप कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे

अकोेला : पश्चिम विदर्भात खरीप कांदा उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, याचे उत्पादन चांगले होत असल्याने अकोला जिल्ह्यात खरीप कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे; पण यंदा पावसाने ऐनवेळेवर दडी मारल्याने कांद्याच्या रोपवाटिका करपल्याने कांदा क्षेत्रात घट झाली आहे.कांदा उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी पश्चिम विदर्भात कांदा चाळी बांधण्याकडे कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. अकोला जिल्ह्यात तर कांदा चाळी तयारही करण्यात आल्या आहेत. शेतकरी सामूहिक गटाने पुढाकार घेतल्याने या कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. कांद्याचे उत्पादन कमी होत असताना, आत्मा आणि कृषी विभागाच्या पुढाकाराने कांदा पुन्हा बहरला आहे. कांदा बीजोत्पादन पिकापासून चांगले उत्पादन मिळत असल्यानेच शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळला आहे.या भागात कांदा उत्पादन वाफ्यानुसार घेतले जात आहे; परंतु सलग दोनशे हेक्टर कांदा काही ठिकाणी घेतला जात असून, यातून चांगला लाभ होत असल्याने शेतकरी गटाच्या सदस्यांमध्ये उत्साह वाढला आहे. कांदा हे पीक अल्पकाळात भरघोस उत्पन्न देणारे असल्याने या पिकावर शेतकरी गटांनी लक्ष केंद्रित केले आहे. अकोला जिल्ह्यात पातूर, अकोला, बार्शीटाकळी तालुक्यात खरीप कांदा घेतला जातो. यंदाच्या खरीप हंगामात कांदा क्षेत्र वाढीचे उद्दिष्ट शेतकऱ्यांनी निश्चित केले होते. पातूर तालुक्यात ५०० एकर क्षेत्रावर कांदा लागवडीचे नियोजन करण्यात आले होते; तथापि पावसाने फटका दिल्याने रोपवाटिका करपल्या आहेत.