Join us  

Vanguard नं Ola चं मूल्यांकन कमी करून १.९ अब्ज डॉलर्स केलं, २५ महिन्यांत ७४ टक्क्यांची घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 10:41 AM

अमेरिकन असेट मॅनेजमेंट कंपनीनं पुन्हा एकदा ओलाची पॅरेंट कंपनी एएनआय टेक्नॉलॉजीजचं मूल्यांकन कमी केलंय.

अमेरिकन असेट मॅनेजमेंट कंपनी Vanguard ने ANI Technologies ची फेअर व्हॅल्यू कमी केली आहे. ही (ANI Tech) टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या ओलाची (Ola) मूळ कंपनी आहे. वॅनगार्डनं तिसऱ्यांदा एएनआय टेकची फेअर व्हॅल्यू कमी केली आहे. नवीन नियामक फाइलिंगमधून ही माहिती समोर आली. आता ओलाचं मूल्यांकन सुमारे १.९ अब्ज डॉलर्स आहे. डिसेंबर २०२१ मध्ये ओलाच्या ७.३ अब्ज डॉलरच्या मूल्यांकनापेक्षा हे ७४ टक्क्यांनी कमी आहे. डिसेंबर २०२१ मध्ये, ओलानं ७.३ बिलियनच्या डॉलर्सच्या मूल्यांकनावर IIFL, Edelweiss PE सह कंपन्यांकडून १३.९ कोटी डॉलर्स उभारले होते. 

मे मध्येही मूल्यांकन केलेलं कमी 

वॅनगार्डनं गेल्या वर्षी मे महिन्यात ओलाचं मूल्यांकन कमी केलं होतं. तेव्हा त्यांनी ओलाचं मूल्यांकन ४.८ अब्ज डॉलर्स इतकं कमी केलं. यानंतर, पुन्हा ऑगस्ट २०२३ मध्ये, त्यांनी ओलाचं मूल्यांकन ३.५ अब्ज डॉलर्स पर्यंत कमी केलं. वॅनगार्डनं २०२० आणि २०२१ मध्येही ओलाचं मूल्यांकन कमी केलं होतं.  

वॅनगार्डची ओलामध्ये भागीदारी 

वॅनगार्डकडे एएनआय टेक्नॉलॉजीजचे १,६६,१८५ शेअर्स आहेत. हा ओलामधील सुमारे ०.७ टक्के स्टेक आहे. मनीकंट्रोलनं यासंदर्भातील माहिती दिली आहे. या आर्थिक वर्षात मूळ कंपनी एएनआय टेक्नॉलॉजीचा निव्वळ तोटा कमी झाल्यानंतर वॅनगार्डनं ओलाचं मूल्यांकन कमी केलंय. कंपनीचा एकत्रित महसूल वार्षिक आधारावर सुमारे ४२ टक्क्यांनी वाढून २,७९९ रुपये झालाय.

टॅग्स :ओलाव्यवसाय