नवी दिल्ली : वस्तुविनिमयाद्वारे साखरेची निर्यात वाढविण्याबाबत सरकार विचार करीत आहे. अलीकडेच पंतप्रधानांनी यासाठी शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिले होते. पंतप्रधानांच्या निर्देशानुसार अन्न मंत्रालय साखरेचा अतिरिक्त साठा विकणे आणि ऊस उत्पादकांची थकबाकी चुकती करण्यासाठी या पर्यायाच्या माध्यमातून साखरेची निर्यात वाढविण्याबाबत शक्यता पडताळून पाहत आहे.मागच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साखर उद्योगाच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे १४ हजार कोटी रुपये साखर कारखान्यांकडे थकीत आहेत.साखरेची निर्यात वाढविण्यासाठी आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश पंतप्रधानांनी संबंधित मंत्रालयांना दिले होते. अन्न मंत्रालय साखरेची निर्यात वाढविण्याबाबत विविध पर्यायांवर विचार करीत आहे.ज्या देशांकडून शेतमालाची आयात केली जाते, अशा देशांना वस्तुविनिमय प्रणालीमार्फत साखरेची निर्यात करण्यास परवानगी देता येईल का? यादृष्टीने अन्न मंत्रालय विचार करीत आहे.इंडोनेशिया आणि मलेशियातून भारत मोठ्या प्रमाणावर खाद्यतेलाची आयात करतो, तर कॅनडा, म्यानमार आणि आॅस्ट्रेलियातून डाळींची आयात केली जाते.देशांतर्गत बाजारात साखरेच्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी साखरेच्या विक्रीवरील उपकर वाढविण्याबाबतही अन्न मंत्रालय विचार करीत आहे. हा उपकर सध्या २४ पैसे प्रति किलो आहे.
साखरेची निर्यात वाढविण्यासाठी वस्तुविनिमय प्रणालीचा अवलंब
By admin | Updated: August 5, 2015 22:42 IST