Join us
Daily Top 2Weekly Top 5

युपीएससी परीक्षेचा वाद आठवडाभरात सोडविणार

By admin | Updated: July 29, 2014 01:52 IST

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नव्या अभ्यासक्रमाविरुद्ध नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नव्या अभ्यासक्रमाविरुद्ध नागरी सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन छेडले असतानाच हा मुद्दा येत्या आठवडाभरात निकाली काढण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिले आहे.‘युपीएससी मुद्दा येत्या आठवडाभरात सोडविला जाईल. याबाबत चर्चा सुरू आहे,’ असे गृहमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निर्देशानुसार या मुद्यावर मार्ग काढण्यासाठी रविवारी बैठक घेण्यात आली होती. बैठकीला वित्तमंत्री अरुण जेटली आणि कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंग उपस्थित होते, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले.एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, सिव्हिल सर्व्हिसेस अ‍ॅप्टिट्यूट टेस्ट (सीएसएटी)चे प्रारूप बदलण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी सरकारद्वारा नियुक्त करण्यात आलेल्या तीन सदस्यीय समितीचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे.तथापि २४ आॅगस्टला होऊ घातलेली नागरी सेवा प्रारंभिक (प्रिलिम्स) परीक्षा स्थगित करण्याच्या संदर्भात विचारले असता राजनाथसिंग यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही. या प्रारंभिक परीक्षेत प्रत्येकी २०० गुणांच्या दोन अनिवार्य प्रश्नपत्रिका असतात. त्यालाच सीसॅट-१ आणि सीसॅट-२ म्हणून ओळखले जाते. अखिलेश यादव यांचे मोदींना पत्रदरम्यान युपीएससी वादात तत्काळ हस्तक्षेप करण्याची विनंती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एका पत्राद्वारे केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)