Join us  

India Unemployment Rate: तब्बल 5 कोटींपेक्षा अधिक लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड; महिलांची संख्याही वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 2:11 PM

India Unemployment Rate : नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार देशातील बेरोजगारांची संख्या 5 कोटींच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये महिलांची संख्याही मोठी आहे.

नवी दिल्ली : भारतासारख्या विकसनशील देशांसमोर लोकसंख्या (Population) आणि बेरोजगारी (Unemployment) हे मोठे आव्हान आहे. कोरोना महामारीमुळे बेरोजगारीचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार देशातील बेरोजगारांची संख्या 5 कोटींच्या पुढे गेली आहे. त्यामध्ये महिलांची संख्याही मोठी आहे.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीने (CMIE) एक दिवस आधी जारी केलेल्या अहवालानुसार, डिसेंबर 2021 पर्यंत भारतात बेरोजगारांची संख्या 5.3 कोटी राहिली. यामध्ये महिलांची संख्या 1.7 कोटी आहे. घरात बसलेल्या लोकांमध्ये त्यांची संख्या अधिक आहे, जे काम शोधण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. सीएमआयईच्या म्हणण्यानुसार, सतत काम शोधूनही बेरोजगार बसलेल्या लोकांची संख्या चिंताजनक आहे.

अहवालानुसार, एकूण 5.3 कोटी बेरोजगार लोकांपैकी 3.5 कोटी लोक सतत कामाच्या शोधात आहेत. यामध्ये जवळपास 80 लाख महिलांचा सहभाग आहे. उर्वरित 1.7 कोटी बेरोजगारांना काम करायचे आहे, परंतु ते सक्रियपणे काम शोधत नाहीत. अशा बेरोजगारांमध्ये 53 टक्के म्हणजेच 90 लाख महिलांचा समावेश आहे. सीएमआयईचे म्हणणे आहे की, भारतातील रोजगार दर खूपच कमी आहे आणि ही एक मोठी समस्या आहे.

जागतिक बँकेच्या (World Bank) म्हणण्यानुसार, कोरोना महामारीपूर्वी जागतिक स्तरावर रोजगाराचा दर 58 टक्के होता, तर कोरोना संकट काळानंतर 2020 मध्ये जगभरात 55 टक्के लोकांना रोजगार मिळत होता. दुसरीकडे, भारतातील केवळ 43 टक्के लोकांनाच रोजगार मिळवण्यात यश आले होते. सीएमआयईच्या अहवालानुसार, भारतातील रोजगार दर आणखी कमी आहे. भारतातील केवळ 38 टक्के लोकांनाच रोजगार मिळत असल्याचे सीएमआयईचे मत आहे.

भारतात महिलांसाठी रोजगाराच्या संधी कमी सीएमआयईच्या मते, भारताला एक समृद्ध अर्थव्यवस्था बनण्यासाठी जवळपास 60 टक्के लोकसंख्येला रोजगार उपलब्ध करून द्यावा लागेल. जागतिक दर्जा गाठण्यासाठी देशात सध्या 18.75 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. यासोबतच महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे. भारतात महिलांसाठी फार कमी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. याशिवाय, सामाजिक पाठबळाचा अभाव हा महिलांच्या कामाच्या मार्गात मोठा अडथळा आहे.

टॅग्स :बेरोजगारीव्यवसाय