Join us

आचारसंहितेत अनधिकृत बांधकामे सुसाट अधिकार्‍यांचे आपसात संगनमत : भूमाफियांचा धुमाकूळ, कोपरखैरणे, दिघा, ऐरोलीत कहर

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

कमलाकर कांबळे/नवी मंुबई: निवडणूक आचारसंहितेच्या आडून भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. शहरात ठिकठिकाणी बेकायदा बांधकामांचा धडाका सुरू आहे. कोपरखैरणे, दिघा व ऐरोली परिसरात तर अनधिकृत बांधकामांनी उच्चांक गाठला आहे. महापालिकेच्या कोपरखैरणे वॉर्ड कार्यालयाच्या बाजूलाच दोन टोलेजंग इमारतींचे बांधकाम बिनदिक्कत सुरू आहे.

कमलाकर कांबळे/नवी मंुबई: निवडणूक आचारसंहितेच्या आडून भूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. शहरात ठिकठिकाणी बेकायदा बांधकामांचा धडाका सुरू आहे. कोपरखैरणे, दिघा व ऐरोली परिसरात तर अनधिकृत बांधकामांनी उच्चांक गाठला आहे. महापालिकेच्या कोपरखैरणे वॉर्ड कार्यालयाच्या बाजूलाच दोन टोलेजंग इमारतींचे बांधकाम बिनदिक्कत सुरू आहे.
सुनियोजित नवी मंुबई शहराला अनधिकृत बांधकामांचा विळखा पडला आहे. गाव - गावठाणातील फिफ्टी-फिफ्टीच्या बांधकामांना ऊत आला आहे. सिडकोच्या मोकळ्या जागा बळकावून त्यावर रातोरात इमारती उभारल्या जात आहे. त्याला आळा घालण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. सध्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामात गुंतल्या आहेत. याचा फायदा घेवून भूमाफियांनी बेकायदा बांधकामांचा धडाका लावला आहे. कोपरखैरणेत वॉर्ड कार्यालयाच्या जवळ माथाडी हॉस्पिटलला खेटून असलेल्या मोकळ्या भूखंडावर मागील काही दिवसांपासून जोरदार बांधकाम सुरू आहे. आठ आठ दिवसांनी नवीन स्लॅब टाकले जात आहेत. तर वॉर्ड कार्यालयाच्या उजवीकडील बाजूस आणखी एका टोलेजंग बेकायदा इमारतीचे बांधकाम सुरू आहे. आतापर्यंत या इमारतीचे सहा स्लॅब टाकून झाले आहेत. त्याचप्रमाणे येथील महावितरण कार्यालयाच्या मागच्या बाजूला जुन्या चाळी तोडून तेथे बहुमजली इमारती उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. विशेष म्हणजे वॉर्ड कार्यालयाजवळ सुरू असलेली दोन्ही बांधकामे राष्ट्रवादीच्या एका स्थानिक पदाधिकार्‍याची असल्याचे बोलले जात आहे. रेल्वे मार्गालगतच्या मोकळ्या जागा तर भूमाफियांना आंदण दिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिघा, रबाळे, गोठीवली, घणसोली तसेच खैरणे-बोनकोडे या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे सुरू आहेत.
दरम्यान, आचारसंहिता संपल्यानंतर या अनधिकृत बांधकामांवर नियोजबध्द कारवाई करण्यात येणार असल्याचे सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे प्रमुख योगेश म्हसे यांनी सांगितले.
........
आदेशाला केराची टोपली
गाव-गावठाणातील बेकायदा बांधकामे नियमित करण्यासाठी सरकारने क्लस्टर योजना जाहीर केली आहे. या धोरणानुसार केवळ सप्टेंबर २0१२ पर्यंतच्याच बांधकामांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. असे असतानाही आजही सर्रासपणे अनधिकृत इमारती उभारल्या जात आहेत. विशेष म्हणजे अनधिकृत बांधकामांवर नजर ठेवण्याची जबाबदारी सिडकोने नोड प्रशासकांवर सोपविली आहे. तर महापालिका विभाग अधिकार्‍यांसह स्थानिक पोलीस निरीक्षकांवर नगरविकास विभागाने बांधकामे रोखण्याची जबाबदारी सोपविली आहे. तसेच अनधिकृत बांधकाम झाल्यास यांनाही जबाबदार धरण्याचे आदेश आहेत. मात्र शासनाच्या या आदेशास आपसात संगनमत करून या सर्व यंत्रणांनी केराची टोपली दाखविली आहे.

..........(.फोटो आहे.....१३ बांधकाम)