Join us  

जगभरातील कंपन्या घेतील बारा टक्के जास्तीचे कर्ज, संशोधनातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 5:03 AM

जगभरातील कंपन्या सुमारे १ ट्रिलियन (एकावर बारा शून्य) डॉलरहून अधिक नवीन कर्ज घेतील, असे एका सर्वेक्षणातील निष्कर्षांवरून दिसत आहे.

लंडन : जगभरात कोरोनाच्या साथीने हाहाकार पसरविला असून, अनेक ठिकाणच्या अर्थव्यवस्था अनेक दिवस ठप्प झाल्या होत्या. त्यामुळे यंदा सर्वच उद्योगांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. यामुळे उद्भवलेल्या कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी व झालेला तोटा भरून काढून उद्योगांसाठी पुरेसे भांडवल राखण्यासाठी कर्ज काढण्याशिवाय अन्य पर्याय उद्योगांपुढे नाही. चालू वर्षात जगभरातील कंपन्या सुमारे १ ट्रिलियन (एकावर बारा शून्य) डॉलरहून अधिक नवीन कर्ज घेतील, असे एका सर्वेक्षणातील निष्कर्षांवरून दिसत आहे.येथील एका कंपनीने जगभरातील प्रमुख ९०० आस्थापनांचे सर्वेक्षण करून त्यांना त्यांच्या व्यवसायाबाबत तसेच त्यातील अडचणींबाबत प्रश्न विचारले. या प्रश्नांच्या उत्तरातून बाहेर आलेल्या माहितीचे विश्लेषण करून या कंपनीने आपला अभ्यास अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालातून या वर्षात जगभरातील कंपन्या मोठ्या प्रमाणावर कर्ज उचलतील असे दिसून येत आहे.या वर्षामध्ये जगभरातील कंपन्यांच्या कर्जामध्ये १२ टक्के वाढ होण्याची भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली असून, कंपन्यांवरील एकूण कर्ज हे ९.३ ट्रिलियन अमेरिकन डॉलर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एखाद्या मध्यम आकारमानाच्या देशाच्या अर्थव्यवस्थे-एवढे हे कर्ज असणार आहे.मार्च महिन्यापासून जगभरातील वित्तीय संस्थांचा कारभार जवळपास बंदच होता. त्यामुळे त्यांच्याकडून कर्ज दिले गेलेले नाही. युरोप, अमेरिका तसेच जपानने आपल्याकडील उद्योगांना मदत देण्यासाठी खास योजना आखल्या असून, त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे.सध्याचा विचार करता जगभरातील कंपन्यांकडे असलेल्या कर्जाची आकडेवारी बघता सन २०१४ च्या सुमारे ४० टक्के कर्ज आजच त्यांच्या डोक्यावर आहे. या कर्जावरील व्याज व त्याची परतफेड यासाठी या कंपन्यांना आपल्या फायद्यातील मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे. परिणामी या कंपन्यांचा नफा घटणार असून, त्याची झळ कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना बसणार आहे. त्यांना मिळणारे लाभांशाचे उत्पन्न कमी होणार असून, यातून नव्याने निर्माण होणाºया संपत्तीचे प्रमाण घटण्याची मोठी शक्यता असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.मागील वर्षी वाढले कंपन्यांचे ८ टक्के कर्ज- मागीलवर्षी विविध कंपन्या आणि आस्थापना यांचे विलीनीकरण आणि एकत्रिकरण यामुळे मोठ्या प्रमाणावर कर्जाची उलथापालथ झालेली दिसून आली. मागील वर्षी कंपन्यांच्या कर्जामध्ये ८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. याशिवाय कंपन्यांनी केलेली शेअर्सची फेरखरेदी व शेअर्सवर दिलेला लाभांश यासाठीही कंपन्यांना कर्ज घ्यावे लागले होते. यंदा मात्र परिस्थिती आणखीनच बिघडलेली दिसून येत आहे. यामध्ये कोरोनाच्या साथीमुळे झालेल्या लॉकडाऊनच्या नुकसानाचा मोठा वाटा आहे.- गेल्या ५ वर्षात अमेरिकन कंपन्यांवरील कर्ज सातत्याने वाढताना दिसून येत आहे. त्याचप्रमाणे विकसित देशातील कंपन्यांनाही मोठ्या प्रमाणावर कर्ज घेऊन आपले व्यवहार चालवावे लागत आहेत. स्वित्झर्लंड या देशाचा अपवादवगळता अन्य सर्वच देशांमधील कंपन्यांना अधिकाधिक कर्ज घ्यावे लागत असलेले दिसून आले आहे.- जगभरातील कंपन्यांवर असलेल्या एकूण कर्जापैकी सुमारे निम्मे कर्ज हे अमेरिकन कंपन्यांच्या डोक्यावर असल्याचे या अभ्यासात दिसून आले आहे. अमेरिकन कंपन्यांवर ३.९ ट्रिलियन डॉलरचे कर्ज आहे.

टॅग्स :व्यवसाय