Join us
Daily Top 2Weekly Top 5

ऊस तोडणी कामगारांच्या संपावर तोडग्यासाठी प्रयत्न

By admin | Updated: October 22, 2014 22:12 IST

पवारांची शिष्टाई : शिष्टमंडळाशी पुण्यात चर्चा सोमेश्वरनगर (जि. पुणे) : ऊस गाळप हंगाम तोंडावर आला असताना ऊस तोडणी कामगार व वाहतूकदारांचा संप सुरूच आहे. शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी ऊस तोडणी कामगार व वाहतूकदार संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून चार दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. दोन महिन्यांपासून ऊस तोडणी व वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान संपाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. बुधवारी शरद पवार यांनी मेखळी (ता. बारामती) येथे कामगार संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील, पदाधिकारी आश्रुदास कराड, बबनराव पाले, बाबासाहेब घायतोडक, रामदास पानवळ यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. पवार यांनी संघटनेच्या मागण्या समजून घेतल्या. ऊस तोडणी व वाहतूकदारांकडून प्राप्तिकराची कपात करू नये. कामगारांना शासनाने पक्की घरे बांधून द्यावीत. त्यांना स्वच्छ पाणी व वीज पुरवठा करावा. मुकादमांना कामगार विभागामार्फत ओळखपत्रे द्यावीत. कामगारांच्या मुलांना शासकीय व निमशासकीय क्षेत्रात नोकरीत आरक्षण द्यावे आदी मागण्यांविषयी शिष्टमंडळातील सदस्यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. (प्रतिनिधी)-----------शरद पवार व गोपीनाथ मुंडे यांनी आजवर ऊस तोडणी कामगारांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेऊन प्रश्न सोडविले आहे. आम्हाला गोपीनाथ मुंडे यांची उणीव तीव्रतेने भासत आहे. मात्र, शरद पवार आमचे प्रश्न सोडवतील, असा आम्हाला विश्वास आहे.- गहिनीनाथ थोरे पाटीलअध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊस तोडणी व वाहतूक संघटना---