Join us

प्राप्तिकराच्या नोटिशीचा व्यवहार आता ई-मेलवर

By admin | Updated: October 21, 2015 04:13 IST

एखाद्या करदात्याच्या प्राप्तिकर विवरणाच्या छाननीदरम्यान त्यात काही शंका असल्याने सध्या प्राप्तिकर विभागातर्फे जी नोटीस काढली जाते, ती लवकरच ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे

मुंबई : एखाद्या करदात्याच्या प्राप्तिकर विवरणाच्या छाननीदरम्यान त्यात काही शंका असल्याने सध्या प्राप्तिकर विभागातर्फे जी नोटीस काढली जाते, ती लवकरच ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे. एवढेच नव्हे तर करविषयक लहान त्रुटी असल्यास संबंधित करदात्याला त्याच नोटिशीला ई-मेलद्वारेही उत्तर देता येईल व विभागातर्फे हे उत्तर ग्राह्य धरण्यात येणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाने प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकानुसार, ही सुविधा लवकरच सुरू होणार असून सुरुवातीच्या टप्प्यात देशातील १०० कार्यालयांतून ही सेवा कार्यान्वित होईल. यानंतर नियमित टप्प्यांनी या सेवेचा विस्तार होईल.केवळ ई-मेलवर नोटीस धाडणे एवढीच याची व्याप्ती नाही तर यामुळे प्रत्यक्ष कागदाचा वापर कमी करतानाच मनुष्यबळाचे श्रम कमी करण्याचाही हेतू आहे. सध्या जरी एखाद्या विवरणात त्रुटी निघाली तरी त्याच्या निवारणासाठी करदात्याला प्राप्तिकर अधिकाऱ्याला प्रत्यक्ष भेटावे लागते.त्यातही प्राप्तिकर खात्याबद्दल असलेल्या एका अनामिक भीतीचाही लोकांना त्रास होतो. परंतु, आता या नव्या व्यवस्थेमुळे ही भीती दूर करतानाच हे कामही वेगवान पद्धतीने पूर्ण करता येईल. (प्रतिनिधी)