Join us  

देशातील राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये एकूण ४१ हजार पदे रिकामी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 12:22 PM

संसदेतील माहिती : सर्वाधिक रिकाम्या जागा स्टेट बँकेत

नवी दिल्ली : देशातील १२ राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ४१ हजार १७७ पदे रिकामी असून, अधिकारी, लिपिक व त्याहून खालच्या पदांचा त्यात समावेश आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली. गेल्या सहा वर्षांत बँकांतील पदे कमी वा रद्द करण्यात आलेली नाहीत. भरतीची प्रक्रिया सतत सुरू असते, असेही त्यांनी उत्तरात नमूद केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये ८ लाख ५ हजार ९८६ पदे मंजूर असून, त्यापैकी ९५ टक्के पदे भरली गेली आहेत. म्हणजे आजच्या घडीला तितके कर्मचारी बँकांत काम करीत आहेत. मात्र १ डिसेंबर २०२१ रोजी ४१ हजार १७७ पदे रिकामी आहेत.सर्वाधिक म्हणजे ८५४४ रिक्त पदे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असून, त्यात ५१२१ लिपिक व ३४२३ अधिकारी वर्गाची आहेत. पंजाब नॅशनल बँकेत ६७४३, तर सेंट्रल बँकेत ६२९५ पदे रिकामी आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेत ५११२, तर बँक ऑफ इंडियात ४८४८ पदे रिकामी आहेत. या ४१ हजार ११७ पदांमध्ये १७ हजार ३८० जागा अधिकाऱ्यांच्या आहेत आणि १३ हजार ३४० जागा लिपिक पदाच्या आहेत. त्याखालील जी पदे रिक्त आहेत, त्यांची संख्या १३ हजार ३४० इतकी आहे.

या आहेत १२ बँका...स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओवरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक व युनियन बँकेत मिळून ही पदे रिक्त आहेत.

टॅग्स :नोकरीस्टेट बँक आॅफ इंडिया