Join us

देशभरातील १० लाख बँक कर्मचा-यांचा संप

By admin | Updated: November 11, 2014 17:19 IST

वेतनवाढी बाबत कामगार आयुक्तांसोबतची चर्चा निष्फळ ठरल्याने सार्वजनिक बँकेचे देशभरातील १० लाख बँक कर्मचा-यांनी १२ नोव्हेंबर रोजी संप पुकारला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ११ - वेतनवाढी बाबत कामगार आयुक्तांसोबतची चर्चा निष्फळ ठरल्याने सार्वजनिक बँकेचे देशभरातील १० लाख बँक कर्मचा-यांनी १२ नोव्हेंबर रोजी संप पुकारला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचा-यांच्या वेतनवाढीबाबत कामगार आयुक्तांसोबत सोमवारी (दि.१०)  या विषयी चर्चा झाली. बँक व्यवस्थापन संघटनेने कॉस्ट टु कंपनी तत्वावर आधारित पे- स्लिपवरील मुळ पगार, महागाई भत्ता व घरभाडे भत्ता इत्यादीवर ११ टक्के वेतनवाढीची तयारी दाखवली. मात्र बँक कर्मचारी संघटनेने २३ टक्के वेतनवाढीची मागणी केली आहे. या पूर्वी संघटनेने २५ टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव मांडला होता. 
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन ही बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक असोसिएशन यांच्यातील द्विपक्षीय कराराची ही १४ वी फेरी होती. इंडियन बँक असोसिएशनने यापूर्वी असलेला ११ टक्के वेतन वाढीचा प्रस्ताव पुढे ढकलला युनायटेड फोरम बँक युनियन आधी आग्रही असलेल्या २५ टक्के वेतनवाढीवरून २३ टक्क्यांवर आली, परंतू या पुढे तडजोड करण्यास कुणीही तयार नसल्याने बँक कर्मचा-यांना संपाचे हत्यार उपसावे लागले.  याच मागणी करता बँक कर्मचा-यांनी फेब्रुवारी महिन्यात दोन दिवसांचा संप केला होता. 
यापूर्वी झालेल्या नवव्या द्विपक्षीय कराराअंतर्गत दोन्ही पक्षांनी १७.५ टक्के वेतनवाढीच्या करारावर स्वाक्ष-या केल्या आहेत. हा करार ऑक्टोबर २००७ ते ऑक्टोबर २०१२ या कालावधी करता होता. 
सप्टेंबर २०१४ अखेर बँकांमार्फत ७० कोटी रुपयांची कर्जे वितरीत झाली असून एकुण ८४ लाख रुपयांच्या ठेवी आहेत, तसेच व्यवसाय वृद्धी व नफा वाढ होऊनही ६० टक्के नफा बा बुडीत कर्जाच्या  (बॅड डेब्ट्स) तरतुदीसाठी वापरला जात असल्याचा आरोप करत कर्मचा-यांच्या हातावर तुरी दिली जात असल्याचे कर्मचारी संघटनेचे निमंत्रक उटगी यांनी म्हटले आहे.या आंदोलनात सार्वजनिक क्षेत्रातील २७ बँकेच्या ५० हजार शाखेतील १० लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.