टोकियो : जगातील मोठ्या कंपन्यांपैकी एक असणाऱ्या तोशिबा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नफा फुगवून दाखवण्याच्या भ्रष्टाचार प्रकरणात राजीनामा दिला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी हिसाओ तनाका यांनी पद सोडल्यानंतर कंपनीचे अध्यक्ष मसाशी मुरोमाची यांनी पदभार घेतला आहे. २००८ साली कंपनीने नफ्याची आकडेवारी फुगवून दाखविल्याचे अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर तनाका यांच्यासह कंपनीचे उपाध्यक्ष नोरिओ ससाकी आणि सल्लागार अत्सुतोषी निशिदा हेसुद्धा पायउतार झाले आहेत. तोशिबामधील या घोटाळ्याचे पडसाद जपानच्या आर्थिक क्षेत्रात आणि राजकीय वर्तुळातही उमटले आहेत. जपानचे अर्थमंत्री तोरो असो यांनी या सर्व प्रकाराला अत्यंत खेदजनक असे संबोधले आहे. गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा संपादन करत असताना अशी घटना घडणे दु:खदायक आहे, असे ते म्हणाले. उपलब्ध माहितीनुसार तोशिबा कंपनीने अत्यंत मोठी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून व्यवसायास सुरुवात केली. ही उद्दिष्टे व्यवहार्य नसल्यानेच नफा फुगवून दाखविण्याचे प्रकार घडले गेले असे सांगण्यात येते. सोमवारी जाहीर झालेल्या अहवालानुसार तोशिबाने १५१.८ अब्ज येन (१.२२ अब्ज डॉलर्स) नफा वाढवून दाखविल्याचे समोर आले आहे.
तोशिबाचा आकड्यांचा गोंधळ
By admin | Updated: July 21, 2015 23:17 IST